मुलांच्या हाती मृत्यूची चावी ! मिसरूड फुटण्याआधीच वाहन चालविण्याचा अट्टाहास

By संतोष वानखडे | Published: May 25, 2024 04:30 PM2024-05-25T16:30:01+5:302024-05-25T16:31:04+5:30

भरधाव वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता.

reality cheack in washim it was caught on camera that the minors were driving two wheelers | मुलांच्या हाती मृत्यूची चावी ! मिसरूड फुटण्याआधीच वाहन चालविण्याचा अट्टाहास

मुलांच्या हाती मृत्यूची चावी ! मिसरूड फुटण्याआधीच वाहन चालविण्याचा अट्टाहास

संतोष वानखडे, वाशिम : पुणे शहरात अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ या आलिशान गाडीने दुचाकीला उडविल्याची घटना संपूर्ण राज्यात गाजत आहे. या पार्श्वभूमीवर वाशिमसह जिल्ह्यातील प्रमुख शहरांत ‘रिॲलिटी चेक’ केला असता, अल्पवयीन मुले सर्रास दुचाकी वाहने चालवित असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.

लहान मुलांचे अतिलाड कोणते संकट उभे करतील, हे पुणे शहरातील ‘पोर्श’ कार अपघाताने समोर आणले आहे. मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे गुन्हा आहे. मोटार वाहन अधिनियम कलम पाच अंतर्गत वाहन चालविल्यास अल्पवयीन मुलाच्या पालकाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाऊ शकतो. कायद्याने अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास प्रतिबंध केला असला तरी प्रत्यक्षात मात्र वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या शहरातही अल्पवयीन मुले भरधाव वेगाने दुचाकी वाहन चालवित असल्याचे शनिवार, २५ मे रोजी दिसून आले. विशेष म्हणजे बिनदिक्कतपणे ट्रिपल सीट प्रवास करतात. कोणी हटकत नसल्याने, पालकही फारशे गंभीर नसल्याने आणि कायद्याचा धाक उरला नसल्याने अल्पवयीन मुले सर्रासपणे शहरांतून वर्दळीच्या ठिकाणांवरून भरधाव वाहने चालवितात. हा प्रकार वेळीच रोखला नाही तर भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रतिक्रिया सूज्ञ नागरिकांमधून उमटत आहेत.

पालकांनो, वेळीच सावध व्हा!

पालकांनो, तुम्ही पण लहान मुलांच्या हाती कार, बाईक, स्कूटीची चावी (चाबी) देत असाल तर वेळीच सावध व्हा. अल्पवयीन पाल्याच्या हातून कोणतीही अप्रिय घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांवरच असते. अल्पवयीन मुलांच्या चुकीसाठी पालकांना केवळ दंडच नाही तर तुरुंगाची हवा पण खावी लागू शकते. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनाची चावी देताना पालकांनी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले.

नियम काय सांगतो?

साधारण ‘लायसन्स’साठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे. तर, १६ ते १८ वयोमर्यादेतील अर्जदारांना ५० सीसी क्षमतेचे वाहन चालविण्याचे लायसन्स दिले जाते. १८ वर्षांपुढील व्यक्तीला २० वर्षे मुदतीचे लायसन्स दिले जाते. अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास पाच हजारांचा दंड व संबंधित मुलाच्या पालकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो.

राज्यात सर्वत्रच अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती गाडीची चावी देवू नये. अल्पवयीन मुले वाहन चालविताना दिसल्यास गय केली जाणार नाही. - ज्ञानेश्वर हिरडेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

Web Title: reality cheack in washim it was caught on camera that the minors were driving two wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.