भावना गवळींच्या विरोधात पदाधिकाऱ्यांचे ‘बंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 02:05 AM2017-07-25T02:05:09+5:302017-07-25T02:05:09+5:30

हे माझ्या विरुध्द षडयंत्र - गवळी : आजी-माजी पदाधिकारी मुंबई रवाना

'Rebellion' against office bearers | भावना गवळींच्या विरोधात पदाधिकाऱ्यांचे ‘बंड’

भावना गवळींच्या विरोधात पदाधिकाऱ्यांचे ‘बंड’

googlenewsNext

नंदकिशोर नारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शिवसेनेत खासदार भावना गवळी कोणालाही मोठे होवू देत नसून आपल्या सोयीचे राजकारण करतात, जिल्हा प्रमुख राजेश पाटील यांना पदावरुन दूर करण्यासाठीचा आटापिटा केल्या जात असल्याच्या तक्रारीसह इतर तक्रारी घेऊन स्वपक्षातीलच काही आजी - माजी पदाधिकारी २४ जुलै रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. या संदर्भात खासदार भावना गवळी यांच्याशी संपर्क केला असता आपल्याला याची कल्पना असून हे माझ्या विरुद्ध काही विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये खासदार भावना गवळी, प्रकाश डहाके गट व पालकमंत्री संजय राठोड गटामध्ये वाशिम, यवतमाळ जिल्हाप्रमुख निवडीवरुन वादास सुरुवात झाली. सुरुवातीला एका मंचावर एकमेकांच्या संमतीने कार्य करणाऱ्या नेत्यांमध्ये फूट पडल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रकारात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही विखुरल्या गेले आहेत. गत दोन दिवसाआधी खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षातील हालचालींबाबत पक्षश्रेष्ठीकडे गाऱ्हाणे मांडल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यावरुन २४ जुलै रोजी जिल्हयातील काही आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व काही विद्यमान नगरसेवक मुंबई येथे खासदार भावना गवळी यांच्या विरुद्ध तक्रारींचा गठ्ठा घेऊन रवाना झाले आहेत. जिल्हयातून कार्यकर्त्यांना घेऊन १० गाडया २४ जुलैला रवाना झाल्या आहेत. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते खासदार भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार करणार असून त्यामध्ये आतापर्यंत झालेल्या काही जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांना व्यवस्थित वागणूक न मिळाल्याने ते पक्षात सक्रीय नाहीत याला खासदार जबाबदार आहेत, अनेक निवडणुकीत पक्षातील उमेदवार निवडणुकीत उभा राहिल्यानंतर त्याचा पराभव झाला. काही पराभव झालेल्या उमेदवारांनी खासदार गवळी यांच्यामुळे आपला पराभव झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत, नव्यानेच लाभलेले पालकमंत्री संजय राठोड जिल्हयात शिवेसेनेला नवचैतन्य निर्माण करीत असतांना आपले वर्चस्व कमी होत असल्याची भीती निर्माण झाल्याने त्यांना गवळी यांनी विरोध करणे सुरु केले, तसेच पक्षात सक्रीय नसलेले पण भावनातार्इंच्या मागे पुढे फिरणाऱ्यांना पक्षात मानसन्मान देण्यात येत असून खऱ्या समर्थकांना डावलण्याचा प्रयत्न होत आहे अशा तक्रारींसह इतर अनेक तक्रारी घेऊन विरोधक मुंबईकडे रवाना झाले आहेत. या संदर्भात खासदार भावना गवळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जिल्हयातील काही जण माझ्या तक्रारी करण्यासाठी मुंबई येथे गेल्याची कल्पना असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. तसेच याप्रसंगी पक्षातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते माझ्या पाठीशी असून हे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्याचे काम नसून पक्षात नसलेल्यांचे षडयंत्र असल्याचे सांगितले.

जिल्हयातून दहा गाडया मुंबईला रवाना!
पक्षात होत असलेल्या घडामोडी व यामधून पक्षाची होत असलेल्या हाणीसंदर्भात जिल्हयातून दहा गाडया रवाना झाल्या असून यामध्ये काही आजी व माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हयामधून मुंबईसाठी गेलेल्या दहा गाडयांमध्ये वाशिम, कारंजा, मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातून प्रत्येकी दोन व रिसोड , मालेगाव तालुक्यातून प्रत्येकी एका गाडीचा समावेश आहे.

आधी भावना गवळी समर्थक आले जाऊन
शिवसेनेमध्ये काही स्वपक्षातील व काही पक्षाबाहेरील विरोधक षडयंत्र रचून भावना गवळी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब व त्याव्यतिरिकत पक्षातील घडामोडी संदर्भात चर्चा करण्याकरिता परवाच्या दिवशी खासदार भावना गवळी समर्थक जाऊन आल्याचे विरोधकांमध्ये बोलल्या जात आहे.

माझ्या विरोधात तक्रारी द्यायला काहीजण मुंबईला गेल्याची कल्पना आहे. मला तक्रारी करणारे कोण आहेत हे सर्वांनाच माहीत आहे.अन माझ्या विरोधात तक्रारी करायला आहेच काय? राहला विषय वाशिम जिल्हाप्रमुख राजेश पाटील राऊत यांचा तर त्यांना आमचा विरोध कधीच नव्हता अन नाही. यामागे पक्षातील लोकांचे षडयंत्र नाही तर जे पक्षाचे नाव घेतात व बाहेरच्या लोकांना मदत करतात त्यांच्या या उचापती आहेत. काल सर्व पदाधिकारी मुंबईला माझ्यासोबत होते. मी नेहमी पक्षाला मोठे करण्याचे काम केले. वाशिम नगराध्यक्षपदी शिवसेनेचा उमेदवार मताधिक्यांनी निवडून आणला. जे गेले त्यांना माझ्या विरोधात बोलायला विषयंच नाही. मी ज्यांच्यावर अन्याय केला असे म्हणणाऱ्यांनी पुढे यावे आम्ही पक्षप्रमुखांसमोर बसू.
- भावना गवळी, खासदार, यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघ

Web Title: 'Rebellion' against office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.