Maharashtra election 2019 : वाशिम जिल्ह्यात यंदा बंडखोरांमुळे चुरस वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:06 AM2019-10-16T06:06:14+5:302019-10-16T06:47:59+5:30
तीनही विद्यमान आमदार रिंगणात
वाशिमच्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचे चित्र असून वाशीममध्ये शिवसेना तर रिसोडमध्ये काँग्रेसच्या बंडाळीने चुरस निर्माण झाली आहे. युतीमध्ये भाजपकडे वाशिम व कारंजा या जागा आल्या असून शिवसेनेला रिसोड मतदारसंघ देण्यात आला आहे.
आघाडीमध्ये रिसोड व वाशिम काँग्रेसला तर कारंजा विधानसभा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. रिसोड मध्ये काँग्रेसचे उमेदवार अमित झनक, काँग्रेसचे बंडखोर अनंतराव देशमुख व शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ सानप यांच्यामध्ये लढत रंगली आहे. देशमुख-झनक यांच्यामधील सत्तासंघर्ष सर्वश्रृत असल्याने आता देशमुखांसाठी अस्तित्वाची तर झनकांसाठी प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. वाशिममध्ये भाजपाचे उमेदवार लखन मलिक यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार शशीकांत पेंढारकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिध्दार्थ देवळे यांचे आव्हान आहे. या मतदारसंघात शिवसेनेतील मोठा गट हा बंडखोराचे थेट समर्थन करत असल्याने येथे युतीधर्म अडचणीत आला आहे.
दूसरीकडे मानापमान नाटयामुळे काँग्रेसचे उमेदवार रजनी राठोड यांच्यासमोर अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न होत आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांनी विकासकामांचा लेखाजोखा घेऊनच प्रचाराला सुरूवात केली असून या मतदारसंघात पाटणी तसेच राष्टÑवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके, बसपाचे युसूफ पुंजानी यांच्यामध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रिसोडमध्ये दिलीपराव जाधव, वाशिममध्ये डॉ. सिध्दार्थ देवळे व कारंजात डॉ. राम चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे तीनही मतदारसंघामध्ये मतांचे विभाजन निकालावर परिणाम करणारे ठरणार आहे. दरम्यान अमित शाह यांनी मानोरा येथील सभेपूर्वी पोहरादेवीला गेल्यानंतरही रामराव महाराजांची भेट न घेतल्याने बंजारा समाजात पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ आॅक्टोबर रोजी पोहरादेवी येथे धाव घेत संत रामराव महाराजांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा केलेला प्रयत्न जमेची बाजू ठरला आहे.
प्रचारातील चर्चेचे मुद्दे
विधानसभा निवडणुकीत प्रचारात आपण काय करणार हे सांगण्याऐवजी परस्परविरोधी टिकेवरच अधिक भर दिला जात आहे. प्रमुख पक्षाने आपले जाहीरनामे घोषित केलेमात्र ते प्रचारात दिसून येत नसल्याने मतदारांमध्ये चर्चा रंगतांना दिसून येत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी हाच प्रत्येक पक्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तथापि, शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेमके काय करणार हे सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढाच वाचण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यात कर्जमाफी, पिकविमा, पिक नुकसान, शेतमालाचे हमी दर आदी मुद्दे प्रामुख्याने मांडले जात आहेत.
व्हॉटसअॅपवरील संदेश, फेसबुकवरील पोष्टमधूनही परस्परविरोधी टिकेचा भडीमार व त्यावर येत असलेल्या प्रतिक्रीयांवर चांगलेच वादळ उठत आहे.