आनंदाच्या शिधाचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले!
By संतोष वानखडे | Published: September 17, 2023 02:49 PM2023-09-17T14:49:46+5:302023-09-17T14:54:44+5:30
१०० रुपयांत चार वस्तू: उत्सवाचा गोडवा वाढणार.
संतोष वानखडे, वाशिम : गतवर्षी दिवाळी आणि पाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा वितरीत केल्यानंतर यंदा गौरी-गणपती उत्सवातही १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ पात्र लाभार्थींना दिला जात आहे. जिल्ह्याला शिधा जिन्नसचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले असून, गौरी-गणपतीच्या उत्सवात गोडवा आणखी वाढणार आहे.
शासनाच्या घोषणेनुसार १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल याप्रमाणे हा शिधा संच असणार आहे. गतवर्षी राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यंदा मात्र गतवर्षीची पुनरावृत्ती होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने आहेत. शिधा जिन्नसचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले असून, गावपातळीवर त्याचे वितरणही सुरू करण्यात आले आहे.
कोणाला मिळणार आनंदाचा शिधा?
अंत्योदय, अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच दारिद्र्यरेषेखालील (एपीएल) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा योजनेचा लाभ मिळणार आहे. ई-पॉसप्रणालीद्वारे आनंदाचा शिधा वितरित करण्यात येत आहे.
जिल्ह्याला मागणीनुसार आनंदाचा शिधा प्राप्त झालेला आहे. शासनाच्या घोषणेनुसार आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येत आहे. पात्र लाभार्थींनी संबंधित रेशन दुकानात जावून १०० रुपयांत आनंदाचा शिधा घ्यावा. - राजेश वजिरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम