अनंत कोटी, ब्रम्हांड नायक...चा जयघोष; भक्तिमय वातावरणात सुकांडा फाट्यावर 'श्रीं' च्या पालखीचे स्वागत
By दिनेश पठाडे | Published: June 19, 2024 06:56 PM2024-06-19T18:56:19+5:302024-06-19T18:56:58+5:30
श्रींच्या दर्शनासाठी राजुरा, सुकांडा परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती.
वाशिम : हातात भगवे ध्वज, सोबत अश्व, अन् टाळ-मृदंगाच्या गजरात 'अनंत कोटी...ब्रम्हांड नायक...महाराजधिराज...योगीराज...भक्त प्रतिपालक...शेगाव निवासी...समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय...' असा जयघोष करत संत गजानन महाराज यांच्या पालखीसह वारकऱ्यांचे १९ जून रोजी दुपारी सुकांडा फाट्यावर आगमन झाले. यावेळी श्रींच्या दर्शनासाठी राजुरा, सुकांडा परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती.
दुपारी अडीच वाजता दरम्यान पालखीचे सुकांडा फाट्यावर आगमन झाले. श्रींच्या दर्शनाची ओढ असलेल्या भाविकांची दुपारी १२ वाजता पासूनच रिघ लागली होती. पालखीचे आगमन होताच श्रींच्या जय घोषाने परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. जवळपास अर्धा तासा पेक्षा अधिक वेळ पालखी थांबली होती. यावेळी वारकऱ्यांनी विश्रांती घेत चहा नाश्त्याचा आस्वाद घेतला. विश्रांती नंतर पालखी पुढील मुक्कामासाठी नाथनगरी श्री क्षेत्र डव्हाकडे रवाना झाली.
मेडशीत शेकडो भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक
श्रींच्या पालखीचे अकोला मार्गावरील वाशिम जिल्ह्याचे शेवटचे गाव मेडशी येथे १९ जून रोजी आगमन झाले. त्याठिकाणी जमलेल्या भाविकांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला. ‘श्रीं’च्या पालखीचे मेडशी येथे आगमन होण्याची वार्ता कळताच मेडशी, भौरद, भिलदुर्ग, अंधार सांगवी, काळाकामठा, पिंपळदरा, उमरवाडी, कोलदरा, वाकळवाडी, गोकसांगवी, रेगाव, डोंगरकिन्ही आदी गावांतील भाविकांनी मेडशीत गर्दी करुन शेकडो भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक झाले.