पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयार केले ६९ ‘रिचार्ज पीट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 06:51 PM2021-06-09T18:51:07+5:302021-06-09T18:51:33+5:30
'Recharge Peat' for water conservation in Washim : नागठाणा, श्रीगिरी येथील शेतकरी याकामी सरसावले असून, त्यांना भूजल सर्वेक्षण, कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे.
- सुनील काकडे
वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाऊ न देता शास्त्रशुद्ध पद्धतीने अडवून जमिनीत मुरविण्यासाठी ६९ शेतकऱ्यांनी यंदा त्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार केले आहेत. वाशिम तालुक्यातील नागठाणा, श्रीगिरी येथील शेतकरी याकामी सरसावले असून, त्यांना भूजल सर्वेक्षण, कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे.
देशभरातील मागास जिल्ह्यांच्या यादीत वाशिमचा समावेश आहे. दरम्यान, निती आयोगाकडून जिल्ह्यात विविध स्वरूपातील विकासात्मक कामे प्रस्तावित असून, पाणीपातळी खालावलेल्या पाणलोट क्षेत्रात ‘रिचार्ज पीट’ची कामे करण्याचेही नियोजन या माध्यमातून करण्यात आले. त्यास निती आयोगाच्या उच्चस्तरीय समितीमार्फत हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. त्यानुसार, गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले होते. त्याची पाहणी स्वत: जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी करून समाधान व्यक्त केले होते. ‘रिचार्ज पीट’मुळे भर उन्हाळ्यातही संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी दमदार राहिली. त्यामुळे त्यांना बारमाही पिकांपासून उत्पन्न घेता येणे शक्य झाले.
दरम्यान, गतवर्षी ‘रिचार्ज पीट’साठी पुढाकार घेतलेल्या शेतकऱ्यांना झालेला फायदा लक्षात घेऊन यावर्षी लघु पाणलोट क्षेत्र असलेल्या वाशिम तालुक्यातील नागठाणा आणि श्रीगिरी या गावशिवारातील शेतकऱ्यांनी ‘रिचार्ज पीट’ तयार करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोनाच्या संकट काळातही भूजल सर्वेक्षण विभागाचे भूवैज्ञानिक अतुल सुरसे, कृषी विभागाचे भागवत देशमुख आणि जलसंधारणचे अभियंता शुभम गिरी यांनी क्षेत्रीय तपासणीची कामे वेळेत पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी ‘रिचार्ज पीट’ची कामे पूर्ण होऊ शकली, असा सूर संबंधित शेतकऱ्यांमधून उमटत आहे.