वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता
By दिनेश पठाडे | Published: July 15, 2023 03:29 PM2023-07-15T15:29:26+5:302023-07-15T15:30:30+5:30
राज्यातील ९ जिल्ह्यांत १०० विद्यार्थी क्षमतेची नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी केली होती.
वाशिम : जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास २८ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली होती. त्यानुषंगाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाने १४ जुलैला शासन निर्णय जारी केला असून वाशिमात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यांस संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
राज्यातील ९ जिल्ह्यांत १०० विद्यार्थी क्षमतेची नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नवी वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याबाबतचा जागेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांकडे सादर केला होता. वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील ३०.९१ हे. आर. (७७.०० एकर) ई-क्लास जमिन प्रस्तावित करण्यात आली. २८ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाताच वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढील कार्यवाहीला वेग दिला. त्यानुसार तात्पुरत्या स्वरुपात जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे निर्मिती आणि निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महाविद्यालयाकरिता ४४८ पदे
वाशिम येथील नवीन वैद्यकीय महाविद्यायांकरिता विविध संवर्गातील एकूण ४४८ पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. वर्ग- १ ची ४८, वर्ग-दोन ४४, विद्यावेतनाची पदे ५९, वर्ग-३ (नियमित पदे) ९३, काल्पनिक पदे वर्ग-३ (बाह्यस्त्रोताने)१३९ आणि वर्ग-४ (कंत्राटी) ६५ असे पदे असणार आहेत.
४३० खाटांच्या रुग्णालयाकरिता आवश्यक पदे ९८६
वाशिम जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या ४३० खाटांच्या नवीन रुग्णालयांकरिता ९८६ पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. यामध्ये वर्ग-१ ची ३, वर्ग-२ ची १४, वर्ग- ३ (नियमित पदे) ५०३, वर्ग-३ (काल्पनिक पदे) ३७, वर्ग-४ (कंत्राटी) ४२९