तालुकास्तरावर होणार शेतकऱ्यांच्या पिकविमा तक्रारींचे निवारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:57 PM2019-07-15T14:57:27+5:302019-07-15T14:57:33+5:30
कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : पिकविम्याच्या प्रश्नावर २१ जून रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधीमंडळामध्ये उंबरठा उत्पन्न, जोखीमस्तर, तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती यासोबतच निकषात बदल करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सहाही तालुक्यांमध्ये समित्यांचे गठण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटणी यांनी १४ जुलै रोजी दिली.
पिकविमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदार राहतील; तर तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय या समितीमध्ये गटविकास अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, दोन शेतकरी, अग्रणी बँकेचे तालुकास्तरीय प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्राचे दोन प्रतिनिधी आदिंचा समावेश करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तक्रारींची देखील दखल घेतली जाणार असल्याचे आमदार पाटणी यांनी सांगितले.
तथापि, ज्या शेतकऱ्यांच्या पिकविमासंदर्भात तक्रारी असतील, अशा शेतकºयांनी पिकविमा तक्रार निवारण समितीकडे तक्रारी दाखल कराव्या, असे आवाहन आमदार पाटणी यांनी केले. विधीमंडळामध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी उंबरठा उत्पन्न काढताना जोखीमस्तर ७० टक्यांवरून ९० टक्के तसेच ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ याऐवजी ‘बेस्ट आॅफ सेवन’ यानुसार सात वर्षांपैकी ज्यावर्षी सगळ्यात जास्त उत्पन्न असेल ते ग्राह्य धरावे, ही मागणी देखील केंद्र शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.