अधिवास संपत चालल्यानेच पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात - शिवाजी बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:13 PM2020-01-11T18:13:36+5:302020-01-11T18:13:55+5:30
वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे अध्यक्ष तथा पक्षीमित्र शिवाजी बळी यांच्याशी साधलेला हा संवाद...
वाशिम : पुर्वीच्या काळात रानावनात, घरांच्या अंगणातील झाडाझूडूपांवर सकाळच्या सुमारास अनेक पक्ष्यांचा किलबिलाट राहायचा. तो ऐकण्यासारखा व पाहण्यासारखा असायचा; मात्र काळाच्या ओघात हे चित्र दुर्मिळ झाले असून झाडांवर दिसणारे पक्ष्यांचे थवे बहुतांशी नामशेष झाली आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून, ते मानवासाठी देखील धोकादायक ठरत आहे. एकूणच गतीने घडत असलेल्या या घडामोडींबाबत वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे अध्यक्ष तथा पक्षीमित्र शिवाजी बळी यांच्याशी साधलेला हा संवाद...
पक्ष्यांसंदर्भात वाशिम जिल्ह्याची स्थिती काय ?
विविध प्रजातींच्या पक्ष्यांमुळे वाशिम जिल्हा याबाबतीत निश्चितपणे समृद्ध आहे. तपोवन परिसर, कारंजा-सोहळ अभयारण्य, एकबूर्जी जलाशय यासह इतरही ठिकाणी बाराही महिने अधिवास असलेले अनेक पक्षी आढळतात. यासह परराज्यातून स्थलांतरण करणारा ईगल हा शिकारी पक्षीही ऋतुमानानुसार आढळतो. कारंजा-सोहळ अभयारण्यात तनमोर नावाचा पक्षी असून एकबूर्जी जलाशयावर प्रामुख्याने हिवाळ्यात स्थलांतर करणाºया ‘फ्लेमींगो’चे वास्तव्य राहते. याच जलाशय परिसरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात १८० विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले होते.
‘फ्लेमींगो’ पक्ष्याचे आगमन झाले का, किती दिवस वास्तव्य होते?
गुजरात राज्यातील कच्छच्या वाळवंटात अंडी दिल्यानंतर फ्लेमींगो हा पक्षी दरवर्षी स्थलांतर करून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वाशिम शहरानजिकच्या एकबूर्जी जलाशयावर पोहचतो. त्यानुसार, या पक्ष्यांचा एक थवा डिसेंबरमध्ये आला होता; मात्र काहीच दिवस वास्तव्य करून तो दिसेनासा झाला. लोणारच्या सरोवर परिसरातही यंदा प्रथमच फ्लेमींगो आढळून आला. तथापि, परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणची जलाशये तुडूंब असल्याने या पक्ष्याने स्थलांतरणादरम्यान मार्ग बदलल्याची शक्यता आहे.
पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागील कारणे काय?
पुर्वीच्या काळात प्रामुख्याने माळाची व कवेलू किंवा टिनपत्र्यांची घरे असायची. त्यात कुठेही निवारा करून पक्ष्यांना वास्तव्य करणे, अंडी देणे शक्य व्हायचे. गत काही वर्षांमध्ये मात्र सर्वच ठिकाणी सिमेंट-काँक्रीटची घरे झाली असून वाढत्या अतीक्रमणामुळे गवताळ भागही नामशेष होत चालला आहे. याशिवाय दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांमुळे विविध प्रकारचे प्रदूषण देखील वाढले आहे. एकूणच या सर्व प्रतिकुल बाबींमुळे पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात येत असल्यानेच पक्ष्यांची संख्याही कमी होत चालल्याचा निष्कर्ष पक्षीमित्रांनी काढला आहे.