स्वस्त धान्य दुकानांतील गहू वितरणात कपात!

By admin | Published: May 3, 2017 01:52 AM2017-05-03T01:52:56+5:302017-05-03T01:52:56+5:30

तांदळाचा साठा वाढल्याचा परिणाम : अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांची होणार गैरसोय

Reduction in wheat grains in cheapest grain shops! | स्वस्त धान्य दुकानांतील गहू वितरणात कपात!

स्वस्त धान्य दुकानांतील गहू वितरणात कपात!

Next

वाशिम : पुरवठा विभागाकडील तांदळाचा साठा अचानक वाढल्याने स्वस्त धान्य दुकानांमधून होणाऱ्या गहू वितरणात कपात करून त्याऐवजी लाभार्थींना तांदूळ दिला जात आहे. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांना बसला असून, त्यांना आपली गरज भागविण्याकरिता खुल्या बाजारातून अधिक दराने गहू विकत घ्यावा लागत आहे.
जिल्ह्यातील २ लाख ८९ हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांपैकी जवळपास दीड लाख कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, तांदूळ आणि साखरसह आवश्यक वेळी इतर धान्य आणि तेलाचा रास्त दराने पुरवठा केला जातो. शहरी भागात ५९ हजार; तर ग्रामीण भागात ४० हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या किंवा शेतमजूर केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. संबंधितांना महिन्याला मानसी ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचे वितरण केले जाते; परंतु दोन महिन्यांपासून या प्रमाणात बदल करून संबंधित कुटुंबांना मानसी २ किलो गहू आणि ३ किलो तांदळाचे वितरण करण्यात येत आहे; तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थींसाठी प्रति कुटूंब २० किलो गहू आणि १५ किलो तांदळाचे वितरण केले जात होते. त्यातही बदल करून आता संबंधित कुटुंबांना १९ किलो गहू आणि १६ किलो तांदूळ, या प्रमाणात वितरण सुरू करण्यात आले आहे. पुरवठा विभागाकडे तांदळाचा साठा अधिक झाला असल्याने वितरणाच्या प्रमाणात हा बदल करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात रोजच्या जेवणासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख घटकांत किं वा धान्यांत गहू आवश्यक असतो. भात हा पदार्थ चवीसाठी अथवा आवडीनुसार जेवनात ठेवला जातो. त्यामुळे आता तांदळाचे प्रमाण वाढवून गहू वितरण कमी झाल्याने महिन्यातील पंधरा दिवस स्वस्त धान्यावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना बाजारातून गहू विकत घ्यावा लागत आहे. स्वस्त धान्य दुकानांत २ रुपये किलोने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदळाचे वितरण होते. त्यामुळे फारशी गरज नसलेल्या धान्यावर नाहक खर्च करावा लागत आहेच. शिवाय आवश्यक धान्याचे प्रमाण कमी झाल्याने शिधापत्रिकाधारक कुटुंबाला जवळपास १० पट अधिक भाव असलेला गहू विकत घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

स्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न
वाशिम जिल्ह्यात साधारणत: भात खाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शिधापत्रिकांवर तांदळाचे वितरण वाढविल्याने अनेक कुटुंबांना अडचणी जाणवत असल्याचे पुरवठा विभागाच्याही लक्षात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन लाभार्थींच्या सोयीसाठी तांदूळ वितरणाचे प्रमाण कमी करून गव्हाचे प्रमाण वाढविण्यासाठी तहसील स्तरावरून जनतेच्या मागणीनुसार अहवाल मागविण्याचा विचार जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर गव्हाचे वितरण वाढविण्यासाठी शासनाकडे सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गहू वितरणाचे प्रमाण पूर्ववत झाले, तर जिल्ह्यातील एक लाख केशरी आणि ६२ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक मिळून दीड लाखांहून अधिक लाभार्थी कुटुंबांना जाणवणारी मोठी समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे.

जिल्ह्यात केशरी किं वा प्राधान्य असलेल्या शिधापत्रिकांवरील गहू वितरणाचे मानसी प्रमाण एक किलोने कमी करून तांदूळ वितरणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. तांदळाचा साठा वाढल्याने हा निर्णय तात्पुरत्या काळासाठी घेतला आहे. हा निर्णय इतरही जिल्ह्यात आहे. तथापि, जनतेच्या सोयीसाठी गव्हाचा पुरवठा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची बाब विचाराधिन आहे.
- अनिल खंडागळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

Web Title: Reduction in wheat grains in cheapest grain shops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.