हमीभावाने तूर विक्रीसाठी ३० हजार शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:46 PM2020-02-28T14:46:22+5:302020-02-28T14:46:52+5:30
मालेगाव, वाशिम, रिसोड आणि मानोरा या ठिकाणी हमीभावाने तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी भर दिला आहे. या अंतर्गत गुरुवार २६ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सहाही शासकीय खरेदी केंद्रावर मिळून ३० हजार ७११ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. तथापि, काही खरेदी केंद्रावर मोजणी संथगतीने होत असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंतची मुदत आहे.
जिल्ह्यात जिल्हा पणन अधिकारी कार्यालयांतर्गत नाफेडसाठी मालेगाव, वाशिम, रिसोड आणि मानोरा या ठिकाणी हमीभावाने तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहेत, तर विदर्भ कोआॅपरेटिव्ह मार्केटिंग सोसायबटी (व्हीसीएमएस) अंतर्गत कारंजा आणि मंगरुळपीर येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या सहाही केंद्रावर मिळून २६ फेबु्रवारीपर्यंत ३० हजार ७११ शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यात जिल्हा पणन अधिकारी कार्यालयांतर्गत मालेगाव येथील २४००, वाशिम येथील ८२११, मानोरा येथील ३९५०, तर रिसोड येथील २८९४ शेतकºयांचा समावेश आहे. त्याशिवाय व्हीसीएमएस अंतर्गत मंगरुळपीर येथे ७०२९ आणि कारंजा येथील ६२२७ शेतकºयांचा समावेश आहे.
गत महिनाभरापासून नोंदणी प्रक्रिया सुरू असताना आणि आठवडाभरापूर्वी खरेदी सुरू झाली असताना आजवर केवळ ६९८ शेतकºयांकडील ६५८३.९० क्विंटल तुरीची खरेदी होऊ शकली आहे. त्यात सर्वाधिक ५१८ क्विंटल खरेदी ही वाशिम येथील केंद्रावर झाली आहे. त्याशिवाय मालेगाव येथे ८३, मानोरा येथे ६६ शेतकºयांच्या तुरीची खरेदी झाली आहे. व्हीसीएमएस अंतर्गत सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत कारंजा येथे २३, तर मंगरुळपीर येथे केवळ ८ शेतकºयांच्या तुरीची मोजणी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रिसोड येथे तूर खरेदीला अद्याप प्रारंभच नाही
शासकीय खरेदी प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील रिसोड येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु अद्यापही येथील केंद्रावर शेतकºयांच्या तूर खरेदीला प्रारंभ झालेला नाही. या केंद्रावर २६ फेबु्रवारीपर्यंत तूर विक्रीसाठी नोंदणी करणाºया २८९४ शेतकºयांना खरेदीची प्रतिक्षा आहे.
वाशिम जिल्ह्यात नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या तूर खरेदीतील तूर साठविण्यासाठी गोदामांची तजबीज झालेली नव्हती. त्यामुळे खरेदी संथगतीने सुरू होती. आता ही समस्या मिटली आहे. रिसोड येथील खरेदी प्रक्रियाही येत्या एक दोन दिवसांत सुरू होईल.
- एच. एल. पवार
जिल्हा पणन अधिकारी,
अकोला, वाशिम
आमच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करणाºया शेतकºयांना तूर खरेदीसाठी रितसर ‘एसएमएस’ पाठविले जात आहेत. शेतकºयांनी तूर केंद्रावर आणल्यानंतर लगेच मोजणी करण्यात येते. कोणत्याही शेतकºयाला थांबवून ठेवले जात नाही.
- गोपाल हेडा
संचालक , रामदेव कृषी
बाजार खासगी, मानोरा