वाशिम तालु्क्यात ४०० नवमतदारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:21 PM2019-09-15T18:21:52+5:302019-09-15T18:22:14+5:30
१४ सप्टेंबर रोजी १०० मतदार नोंदणी तर १५ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत जवळपास ३०० मतदार नोंदणी झाली.
वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवार व रविवार असे दोन दिवस वाशिम तालु्क्यात मतदार नोंदणी अभियान राबविले असून, एकूण ४०० नवमतदारांची नोंदणी झाली.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात १२ सप्टेंबर रोजी आढावा बैठक झाली होती. ज्यांनी अद्याप नाव नोंदविलेले नाही, अशा मतदारांची नाव नोंदणी करून घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार वाशिम तालुक्यात वरिष्ठांच्या मार्गदर्शनात १४ व १५ सप्टेंबर रोजी मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. १८ व १९ वर्षे वयाच्या मुली, मुले यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली तसेच महिलांचाही प्रतिसाद मिळाला. १४ सप्टेंबर रोजी १०० मतदार नोंदणी तर १५ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत जवळपास ३०० मतदार नोंदणी झाली. मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्रे संकलनाची कार्यवाही केली जात असून, भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १५ सुविधा सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. मतदार नोंदणी अभियान वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व तहसिलदार विजय साळवे यांच्या नेतृत्वात निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार दीपक दंडे व चमूने राबविले.