हरभरा खरेदीसाठी ५४५ शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:56 AM2021-02-26T04:56:59+5:302021-02-26T04:56:59+5:30
शासनाने हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत शेतमालाची खरेदी करण्यासाठी संत गजानन महाराज नावीण्यपूर्ण कृषी प्रक्रिया सहकारी ...
शासनाने हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत शेतमालाची खरेदी करण्यासाठी संत गजानन महाराज नावीण्यपूर्ण कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, मर्या. उमरा कापसे या संस्थेला सबएजंट म्हणून नियुक्त केले आहे. वाशिम व रिसोड तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या हरभरा मालाच्या विक्रीकरिता ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे आवश्यक असून हंगाम २०२०-२१ मध्ये हरभरा पिकाची नोंद असलेल्या तलाठ्याकडून घेतलेला सातबारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक व मोबाईल नंबर नोंदणी करताना सोबत आणावा.
वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील दुकान क्रमांक ७८ मधील संस्थेच्या कार्यालयात व रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी निवासमध्ये ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
................
बॉक्स :
हमीभाव अधिक असूनही प्रतिसाद मिळेना
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हरभरा मालास ४५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. त्या तुलनेत ‘नाफेड’कडून या शेतमालास ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर निश्चित करण्यात आला आहे. असे असताना रिसोडमध्ये मात्र ‘ऑनलाईन’ नोंदणीस शेतकऱ्यांचा विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. २५ डिसेंबरअखेर तालुक्यातील केवळ ४५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.