रक्तदानासाठी तीन हजार युवकांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 02:41 PM2020-02-22T14:41:38+5:302020-02-22T14:41:53+5:30
तीन हजार युवकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली असून, ५० जणांना वेळेवर रक्तपुरवठा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : गरजूंना वेळेवर रक्ताचा पुरवठा करण्यासाठी मालेगाव येथील विघ्यहर्ता फाऊंडेशनने १ जानेवारी २०२० रोजी ‘चालती फिरती ब्लड ब्लँके’चा उपक्रम हाती घेतला. १ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत तीन हजार युवकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली असून, ५० जणांना वेळेवर रक्तपुरवठा केला.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, गरजूंना वेळेवर रक्त पुरविण्यासाठी अनेकजण पुढाकार घेतात. तरीसुद्धा रक्ताचा पुरवठा हा रुग्णांना आवश्यक असणाऱ्या गरजेपेक्षा कितीतरी कमी आहे. या समस्येचे निराकरण करण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून मालेगाव शहरातील युवकांनी विघ्नहर्ता फाऊंडेशनची स्थापना करीत १ जानेवारी २०२० या नववर्षाच्या शुभपर्वावर ‘चालती-फिरती ब्लड बँक’ उभारली आहे. या माध्यमातून युवकांसह नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले जात आहे. रक्तदात्याची यादी तयार करणे, रक्तगटनिहाय यादी करून ती अद्यावत ठेवणे तसेच गरजूंना ताबडतोब रक्तपुरवठा करणे ही व्यवस्था यामार्फत मालेगाव शहरासह तालुक्यात करण्यात आली आहे. आतापर्यंत तीन हजार जणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. या सर्वांची अद्ययावत माहिती संकलित केली असून, रक्तगटनिहाय यादी तयार आहे. रक्तपुरवठ्यासंदर्भातची माहिती अद्ययावत असल्याने गरजू रुग्णांना ताबडतोब रक्तदान करणे, रक्तपुरवठा करणे सोयीचे होत आहे. मालेगाव शहरासह तालुक्यातील गरजूंना वेळेवर रक्तदान करण्यात येत आहे, असे विघ्नहर्ता फाऊंडेशनने स्पष्ट केले. आतापर्यंत गरजू ५० जणांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला. या उपक्रमाला मालेगाव शहरासह तालुक्यातील युवक, नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. यापुढेही नागरिकांनी सहकार्य करावे तसेच नाव आणि रक्तगट नोंदणी करावी, असे आवाहन विघ्नहर्ता फाऊंडेशनने केले.