कोविडनंतर मुख, दातांची नियमित तपासणी करा - डॉ. मंजूषा वराडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 03:40 PM2021-05-09T15:40:19+5:302021-05-09T16:00:28+5:30
Interview : कोरोनामुक्त झाल्यानंतर मुख, दातांची नियमित तपासणी करावी, असा सल्ला डॉ. मंजूषा वराडे यांनी दिला आहे.
वाशिम : कोविडनंतर अनेक ठिकाणी बुरशीजन्य आजार (म्युकॉरमायकोसिस) काही जणांमध्ये आढळून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, गैरसमजही आहेत. पोस्ट कोविडनंतर मुख, दातांची काळजी कशी घ्यावी, मुख व दंत याला संसर्ग होण्यामागील कारणे, लक्षणे काय व उपाय कोणते यासंदर्भात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील दंतचिकित्सा विभागाच्या दंतरोग तज्ज्ञ डॉ. मंजूषा वराडे यांच्याशी ‘लोकमत’ने रविवारी साधलेला हा संवाद.
म्युकॉरमायकोसिस नेमके काय आहे ?
कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये आढळणारा बुरशीजन्य आजार म्हणून म्युकॉरमायकोसिसकडे पाहिले जाते. हा आजार बुरशी (फंगल इन्फेक्शन) या जंतूंमुळे होतो. या आजाराची सुरूवात नाकापासून होते. मग मुख, डोळे तसेच मेंदूपर्यत तो पसरतो. म्यूकॉरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही म्हणजे एकापासून दुसºयाला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही, असे निष्कर्ष समोर येत आहेत.
या आजाराचा धोका कोणाला?
अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण झालेल्या, स्टेरॉइड ड्रग्ज दिलेल्या, कोरोना होऊन बरे झालेल्या रुग्णांना म्हणजे एकंदरीत ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना म्यूकॉरमायकोसिसचा जास्त धोका आहे.
लक्षणे कोणती आहेत?
तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पस येणे, दात हलणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, डोके दुखणे, सायनस रक्त संचय, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यांच्या वर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे, नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.
दक्षता व निदान कसे करावे ?
कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आणि खासकरून मधुमेह आणि इतर आजार असलेल्या रुग्णांनी एकदा मुख आरोग्य तपासणी न चुकता करून घ्यावी. कोरोनातून बरे झाल्यानंतर मुख, दाताशी निगडीत काही समस्या उद्भवली तर सर्वप्रथम दंतरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मौखिक तपासणी करावी. सीटी स्कॅन, नाकाची इंडॉस्कॉपी व बायोप्सीच्या सहाय्याने आपण लवकर म्यूकॉरमायकोसिसचे निदान करू शकतो.
यावर उपचार काय?
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड झालेल्या रुग्णांनी सौम्य बिटाडीन नाकाचे ड्रॉप तसेच नॉर्मल सलाइन, नसल स्प्रे दिवसातून तीन वेळा नाकात टाकल्यास आपण हा बुरशीचा आजार रोखू शकतो. तातडीने निदान करून व संसर्ग शरीराच्या इतर अवयावापर्यंत पोचला असल्यास शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते.