कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 05:50 PM2018-05-26T17:50:53+5:302018-05-26T17:50:53+5:30
सन २००१ ते २००९ या कालावधीतील कर्ज थकीत असलेल्या मात्र सन २००८ व २००९ मधील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
वाशिम : राज्यशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता सन २००१ ते २००९ या कालावधीतील कर्ज थकीत असलेल्या मात्र सन २००८ व २००९ मधील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी २००१ ते २०१६ या कालावधीत घेतलेल्या तथा थकीत कर्जाचा समावेशही या योजनेत करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
कर्जमाफी योजनेत १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकीत रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत पीक कर्ज, पुनर्गठन केलेले व मध्यम मुदतीचे मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या आणि अशा कर्जापैकी ३० जून २०१६ रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंतची मुद्दल व व्याजाची थकीत रक्कम दीड लाखाच्या मर्यादेत माफ होणार आहे. या थकबाकीदार शेतकºयांचे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पूर्वीच्या निकषानुसार सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे. परंतु, याकरिता ५ जून २०१८ पूर्वी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके यांनी कळविले आहे.