रुग्णांसह नातेवाईकांची उघड्यावर "शौचवारी"!
By admin | Published: April 6, 2017 08:05 PM2017-04-06T20:05:16+5:302017-04-06T20:05:16+5:30
वाशिम- जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्ण व त्याचे नातेवाईक लगतच्या खुल्या भूखंडाचा उपयोग शौचविधीसाठी करीत असल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात हल्ली विविध समस्या "आ" वासून उभ्या आहेत. पिण्याच्या शुद्ध पाण्याची उणिव असण्यासोबतच शौचालयांमध्ये सदोदित घाण साचून राहत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना नाईलाजास्तव उघड्यावर शौचास जावे लागत आहे. परिणामी, रुग्णालय परिसरातील निवासस्थान परिसरात प्रचंड प्रमाणात घाण पसरत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा प्रशासनासह, जिल्हा परिषद, नगर परिषद, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावे हगणदरीमुक्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून या मोहिमेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. असे असताना नागरिकांचे आरोग्य जपण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या शासकीय रुग्णालयांमधून हगणदरीमुक्तीच्या या मोहिमेला चक्क सुरूंग लावला जात आहे.