नुकसानभरपाईच्या मदतीसाठी ‘आधार’मधून शेतकऱ्यांची सुटका; बँक खात्यात रक्कम जमा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 11:24 AM2020-07-26T11:24:20+5:302020-07-26T11:24:30+5:30
आतापर्यंत ७० टक्के अर्थात सहा हजार शेतकºयांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळ, अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून जिल्ह्यासाठी १३.६७ कोटी रुपये मिळाले. दरम्यान कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यावेळी आधार क्रमांक सादर करण्याची सक्ती नसल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला. आतापर्यंत ७० टक्के अर्थात सहा हजार शेतकºयांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली.
आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अवकाळी पाऊस पडून जिल्ह्यातील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसानापोटी यापूर्वी तीन टप्प्यात शासनाकडून निधी मिळाला होता. परंतू, यामधूनही अनेक शेतकरी वंचित राहिल्याने महसूल विभागाने फेब्रुवारी महिन्यात शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी नोंदविली होती. शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्याने आणि मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आल्याने निधी मिळणार की नाही, याबाबत शेतकºयांमधून साशंकता वर्तविली जात होती. १५ दिवसांपूर्वी शासनाकडून जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या जवळपास ८७०० शेतकºयांसाठी १३ कोटी ६७ लाख ८५ हजाराचा निधी मिळाला. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आधार कार्ड सादर करणे सक्तीचे करावे की नाही, याबाबत मंथन झाले. शेवटी आधारची सक्ती मागे घेण्यात आल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला. पात्रता यादीत नाव आणि बॅक खाते क्रमांक सादर केल्यानंतर बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा केली जात आहे. आतापर्यंत ८७०० शेतकºयांपैकी ७० टक्के शेतकºयांना अर्थात सहा हजार शेतकºयांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा केली. उर्वरीत ३० टक्के शेतकºयांनी तातडीने बँक खाते क्रमांक सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला १३ कोटी ६७ लाखांचा निधी मिळालेला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नुकसानभरपाईच्या रकमेसाठी आधार क्रमांकाची सक्ती करू नये अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या. आतापर्यंत ७० टक्के शेतकºयांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्यात आली.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम