कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करा!
By admin | Published: July 10, 2017 02:03 AM2017-07-10T02:03:35+5:302017-07-10T02:03:35+5:30
शिवसेना आक्रमक : याद्या प्रसिद्ध न झाल्यास आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी दर्शनी भागात लावण्याच्या मागणीसाठी शिवसेना तालुका शाखा आक्रमक झाली आहे. सदर याद्या न लावल्यास १० जुलै रोजी बँकांसमोर आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख महादेव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीत दिला.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूळकर, खासदार भावना गवळी, जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रिसोड येथे शिवसेनेची बैठक पार पडली. यावेळी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी बँकांनी जाहीर करावी, तसेच बँकेसमोर लावावी, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य न झाल्यास विविध टप्प्यात आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा जाहीर केला असून, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत किती कर्ज माफ झाले, याची माहिती नाही. जोपर्यंत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची अधिकृत यादी संबंधित बँक प्रसिद्ध करीत नाही तोपर्यंत शेतकरी कर्ज माफीमध्ये बसला किंवा नाही, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार नाही. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले त्या बँकांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी फलकावर लावावी, या शेतकरी हिताच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक असल्याचे ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. बँकांना ही माहिती देण्यास भाग पाडले जाणार आहे. केनवड येथे सकाळी १० वाजता, मांगुळझनक येथे सकाळी ११ वाजता, केशवनगर येथे सकाळी ११.३० वाजता, रिठद येथे दुपारी १२.३० वाजता, चिखली येथे १.३० वाजता, रिसोड येथे २ वाजता, वाकद येथे ३ वाजता, मोप येथे ३.३० वाजता अशा विविध ठिकाणी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी फलकावर लावण्याची मागणी केली जाईल.