धार्मिक सलोख्याची प्रचिती : मियॉ बाबांच्या दर्गाहमध्ये झाले ओंकारगीर महाराजांच्या पालखीचे पुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:35 PM2018-08-04T13:35:17+5:302018-08-04T13:36:56+5:30
शिरपूर जैन: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे ४ आॅगस्ट रोजी ओंकारगीर बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढलेली पालखी परंपरेनुसा मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गात नेऊन तेथे दर्गाहच्या मुजावरांकडून पुजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे ४ आॅगस्ट रोजी ओंकारगीर बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढलेली पालखी परंपरेनुसा मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गात नेऊन तेथे दर्गाहच्या मुजावरांकडून पुजन करण्यात आले. धार्मिक सलोख्याचा प्रचिती देणारी ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहे. या धार्मिक विधीनंतरच भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
केवळ वाशिम जिल्हाच नव्हे, तर देशभरात संतांची नगरी म्हणून शिरपूर जैनची ओळख आहे. या ठिकाणी विविध देवदेवतांसह संत महात्म्यांची मंदिरे आहेत. येथील जैन मंदीर जगप्रसिद्ध असल्याने जैनांची काशी म्हणूनही शिरपूर ओळखले जाते. या ठिकाणी संत जानगीर महाराज आणि मिर्झा मियॉ यांच्या समाधी आहेत. हे दोघे समकालीन मित्र होते. त्यांच्या स्मृतीसह विविध उत्सवानिमित्त पालखी आणि उर्सचे आयोजन होते जानगीर महाराजांची पालखी शेकडो वर्षांपासून मिर्झा मियॉ दर्गाहमध्ये नेण्यात येते, तर मिर्झा मियॉ बाबांच्या उर्सनिमित्त काढलेली संदल मिरवणूक ही जानगीर महाराज संस्थानमध्ये नेण्यात येते. त्याशिवाय गेल्या २२ वर्षांपासून जानगीर महाराजांचे शिष्य संत ओंकारगीर महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची पालखीही मिझॉ मियॉ बाबांच्या दर्गाहमध्ये नेऊन तिचे मुजावरांच्या हस्ते पुजन करण्यात येथे. नैवैद्य चढविला जातो. हिंदू भाविक तेथे धार्मिक विधी साजरे करतात, तर मुस्लीम बांधवही मनोभावे पालखीपुढे माथा टेकवितात. यंदाही संत ओंकारगीर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काढलेली पालखी मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गाहवर नेण्यात आली आणि परंपरेनुसार मुजावरांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. जानगीर महाराज संस्थानच्या विश्वस्तांकडून मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गाहमधील मुजावरांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर जानगीर महाराज संस्थानवर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.