रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजनचा अवैध साठा केल्यास कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:54+5:302021-05-05T05:07:54+5:30
वाशिम : रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागामार्फत आवश्यक ...
वाशिम : रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागामार्फत आवश्यक कार्यवाही केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात कोणीही रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजनचा अवैध साठा किंवा चढ्या दराने विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिला.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हास्तरावर नियुक्त समन्वय कक्षाच्या माध्यमातून दैनंदिन ऑक्सिजनची मागणी नोंदविणे व या मागणीच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे काम केले जात आहे. तसेच गरजू रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून कार्यवाही केली जात आहे.
सद्यस्थितीत मागणी वाढली असल्याने ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा अवैध साठा करून त्याची चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता बळावली आहे. काही ठिकाणी असे प्रकारही समोर येत आहेत. अशा प्रकारे कोणीही ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा अवैध साठा करून ठेवल्याचे किंवा त्याची चढ्या दराने विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अधिकृत वितरकांशिवाय कोणीही ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आल्या आहेत. असे प्रकार घडत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी ८३७९९२९४१५ या क्रमांकावर व्हाॅट्सॲप संदेश करून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे.