पोलीस पाटलांचे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:29 PM2017-07-21T13:29:04+5:302017-07-21T13:29:04+5:30
आश्वासनाची आठवण करून देणे, हा या स्मरणपत्र आंदोलनाचा उद्देश आहे, तसेच अनेक ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे.
आश्वासनाच्या पूर्ततेची मागणी: राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचा उपक्रम
मानोरा: पोलीस पाटलांच्या सर्व मागण्या आणि प्रश्नांचे दोन महिन्यांत परिक्षण करून ते निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी २० फेब्रुवारी रोजी दिले होते; परंतु आता १८ महिने उलटले तरी, याबाबत कोणतीच पावले उचलण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी पोलीस पाटलांच्यावतीने स्मरण पत्र आंदोलन राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेकडूनही मुख्यमंत्र्यांना बुधवारी स्मरणपत्र पाठविण्यात आले.
गतवर्षीच्या २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेमार्फत नागपूर येथे पोलीस पाटलांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयोजित या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले होते. पोलीस पाटलांचे मानधन, समस्या, मागण्यांचा पूर्ण अभ्यास करून दोन महिन्यांत ते निकाली काढू, असे ते म्हणाले होते. तथापि, याबाबत कोणताही निर्णय किंवा कार्यवाही होत नसल्याने पोलीस पाटील संघटनांच्यावतीने आमदार, खासदार, तसेच मंत्र्यांना गेल्या आठवड्यात निवेदने सादर करून त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून राज्यभरातील पोलीस पाटील संघटनांच्यावतीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांच्या आश्वासनाचे स्मरण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस पाटलांना सध्या तीन हजार रुपये मानधन मिळत आहे. ते किमान सात हजार पाचशे रुपये करावे, या प्रमुख मागणीसह इतरही महत्त्वाच्या मागण्या मुख्यंमंत्र्यांकडे करण्यात आल्या असल्याचे वाशिम जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शामराव राठोड यांनी सांगितले आहे.
गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष पंढरीनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार पोलीस पाटील संघटनेतर्फे राज्यभरातील पोलीस पाटलांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देणे, हा या स्मरणपत्र आंदोलनाचा उद्देश आहे, तसेच अनेक ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. यानंतरही कायद्याच्या चौकटीत राहून वेगवेगळे आंदोलन करण्यात येईल. -वासुदेव सोनोने, जिल्हा सचिव पोलीस पाटील संघटना, वाशिम