मतदार यादीतील त्रुटी तत्काळ दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:21+5:302021-09-17T04:49:21+5:30
वाशिम : शहरातील मतदार यादीतील नावे, पत्ते व वॉर्ड क्रमांकामध्ये विविध स्वरूपातील त्रुटी असून यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांना नाहक ...
वाशिम : शहरातील मतदार यादीतील नावे, पत्ते व वॉर्ड क्रमांकामध्ये विविध स्वरूपातील त्रुटी असून यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटी तत्काळ दूर कराव्या, अशी मागणी शिवसेनेने तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांकडे १६ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, येत्या काही महिन्यात वाशिम नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. गतवेळच्या निवडणुकीदरम्यान शहरातील विविध वार्डांत मतदारांची नावे दुसऱ्या वार्डात वळती झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. काही लोकांची तिसऱ्या वार्डात नावे गेल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होऊन उमेदवारांचे नुकसान झाले. येणाऱ्या निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, ज्या वार्डातील नावे त्याच वार्डाच्या मतदार यादीत असावी, याकडे आतापासूनच लक्ष देणे आवश्यक असल्याचे शिवसेनेने निवेदनात नमूद केले. त्यानुषंगाने मतदार यादीत त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी शिवसेना तालुका प्रमुख रामदास मते, युवा सेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, नामदेव हजारे, उद्धव खंदारे, राजाभैय्या पवार, केशव डुबे, बंडू शिंदे, नारायण ठेंगडे, रत्नाकर गंगावणे, मोहन देशमुख, राजू जानीवाले, रामकिसन वानखेडे, वैभव कडवे, अमोल सुरूसे, गौरव शेळके आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.