पीक कर्ज पुनर्गठित थकबाकीदार संभ्रमात!
By admin | Published: July 8, 2017 01:49 AM2017-07-08T01:49:07+5:302017-07-08T01:49:07+5:30
कर्जमाफीबाबत शेतकरी गोंधळात
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कर्जमाफीच्या निर्णयानंतरही, पीक कर्ज पुनर्गठन केलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीच्या कक्षेत घेतले जात नसल्याची धक्कादायक बाब वाशिम जिल्ह्यातून समोर येत आहे. जून २०१६ पूर्वी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसल्यानंतर, राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. यानुसार ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज पुनर्गठन केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेत असल्याचे निर्णयात नमूद आहे. यानुसार वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज पुनर्गठन केलेल्या; परंतु ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा लेखाजोखा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी घेणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप या कार्यवाहीला सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे. यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुनर्गठन केलेल्या; परंतु थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मर्यादेची कर्जमाफी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. पुनर्गठन केलेले; परंतु थकबाकीदार असलेले शेतकरी यासंदर्भात बँकांशी संपर्क साधत आहेत. मात्र, वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना नसल्याने तूर्तास कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
सन २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्जाचे पुनर्गठन केलेले; परंतु ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. यासंदर्भात बँकांनादेखील योग्य त्या सूचना केल्या जातील.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था वाशिम