पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:09+5:302021-05-08T04:43:09+5:30
शिरपूर जैन ग्रामपंचायतद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा वॉर्ड नंबर १ ते ४ मधील काही भागात अशुद्ध स्वरूपाचा होत आहे. त्यासाठी ...
शिरपूर जैन ग्रामपंचायतद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा वॉर्ड नंबर १ ते ४ मधील काही भागात अशुद्ध स्वरूपाचा होत आहे. त्यासाठी वेळोवेळी नागरिकांनी ग्रामपंचायतला सूचनादेखील दिल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यातच मागील काही दिवसांपासून गावात ताप आजाराचे रुग्ण वाढले आहेत. तापाच्या रुग्णांचे रूपांतर कोरोना रुग्णात होत आहे. आणि ते अशुद्ध पाण्यामुळे होत असल्याचे तक्रारदारांचे मत आहे. त्यामुळे किमान गावात पाणीपुरवठा शुद्ध असावा यासाठी वाॅर्ड नंबर एक ते चारच्या नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते किशोर प्रकाशराव देशमुख यांनी शिरपूर ग्रामपंचायतकडून होणारा अशुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा बंद करून तात्काळ शुद्ध पाणीपुरवठा करावा अन्यथा अशुद्ध पाण्याच्या बाटल्यांची माळ ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वाराला अटकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ३० एप्रिल रोजी लेखी निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायतने नालीला लागून असलेले व्हाॅल्व्ह जमिनीपासून थोडे उंच करण्यासह लिकीज असलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम ६ मे रोजी सुरू केले आहे. या कामाकडे ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकडे व सरपंच पती संतोष अढांगळे स्वतःहून लक्ष देत आहेत. गावात पाणीपुरवठा स्वच्छ स्वरूपाचा व्हावा यासाठी जेथे जेथे जलवाहिनी नादुरुस्त असेल त्या सर्व ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी, अशी अपेक्षा किशोर देशमुख यांनी व्यक्त केली.