रिसोडातील एटीएम बंद; ग्राहक त्रस्त
By admin | Published: May 19, 2017 07:35 PM2017-05-19T19:35:51+5:302017-05-19T19:35:51+5:30
रिसोड : ५०० व एक हजार रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एप्रिल महिन्यापासून रिसोड शहरासह तालुक्यातील जनतेने रोकड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : ५०० व एक हजार रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एप्रिल महिन्यापासून रिसोड शहरासह तालुक्यातील जनतेने रोकड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. शहरातील एटीएम बंद असल्याने आणि १० ते १५ हजारापेक्षा जास्त रकमेचा ह्यविड्रॉलह्ण होत नसल्याने सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५००, १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जाहिर केला होता. सुरूवातीच्या दोन महिन्यापर्यंत नोटाबंदीची झळ सर्वच स्तरातील नागरिकांना बसली. जानेवारीच्या मध्यानंतर रोकड टंचाईचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात निवळला होता. एटीएममध्येही पैसा राहू लागला. मात्र, २० एप्रिलनंतर रोकड टंचाईची झळ पुन्हा नागरिकांना बसू लागली. रोकड टंचाईचा प्रश्न अद्यापही निकाली निघाला नाही. रिसोड शहरात स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय बँक या प्रमुख बँकांसह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, अर्बन व खासगी सहकारी बँका आहेत.द दोन एटीएमचा अपवाद वगळता उर्वरीत एटीएम पैशाअभावी बंद असल्याचे दिसून येते. बँकांमधूनदेखील १५ हजारापेक्षा अधिक रकमेचा विड्रॉल मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: खरिप हंगाम तोंडावर आलेला असताना, शेतकऱ्यांना पीककर्जाची रक्कम बँकेतून काढणे कठीण होत आहे. यामुळे मशागतीची कामे करणाऱ्या मजूरांना मजूरी देण्यासाठी तसेच बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैशाची चणचण भासत आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध होईल, अशी माहिती २५ दिवसांपूर्वी जिल्हा अग्रणी बँक प्रशासनाने केली होती. मात्र, अद्यापही पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध नसल्याने रिसोड शहरातील एटीएम बंद ठेवण्याची वेळ आली आहे.