जानोरी येथे आगपेटीमुक्त शिवार योजनेचा ठराव
By admin | Published: March 3, 2017 01:13 AM2017-03-03T01:13:26+5:302017-03-03T01:13:26+5:30
जानोरी गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत आगपेटीमुक्त शिवार करण्याची शपथ घेतली.
कारंजा लाड, दि.२ : गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा कारंजा तालुक्यात राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण झालेल्या यावार्डी, जानोरी गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत आगपेटीमुक्त शिवार करण्याची शपथ घेतली.
शेतकरी बरेचदा आपल्या शेतातील काडीकचरा शेतात किंवा धुऱ्यावर पेटवून देतात. परिणामी, जमिनीची धुप होऊन जमिनीमधील बायोमास नष्ट होते तसेच सेंद्रिय कार्बनचे प्रमाण कमी होते.
यामुळे पीक उत्पन्नात घट होऊन जमिनीमधील पाणी शोषणाची क्षमता कमी होते. आपली जमीन सुपिक रहावी, याकरिता पाणी फाउंडेशनकडून गावातील दोन महिला व तीन पुरूष वर्गांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी याविषयी गावात माहिती देऊन आपले गाव स्पर्धेत सहभागी असल्यामुळे गावात आगपेटीमुक्त शिवार योजनेचा जानोरी व यावार्डी गावाने एकमताने ठराव पारित केला. यावेळी यावार्डी येथील सरपंच शोभा धनगाव, प्रशांत हागोने, दिलीप लबडे, बाळासाहेब पोहेकर, अंबिका भिसे, वासुदेव बोनके, प्रवीण कदम, सुनील बोनके, नाना मडके, मोहन कदम, गिरधर बोनके, तुफन बोनके, परमेश्वर आमले आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.