कोरोनाच्या संकट काळात अन्नदान करणाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:59+5:302021-05-20T04:44:59+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लादल्याने इतर दुकानांसह हाॅटेल्स, भोजनालयेही बंद होती. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय व्हायला लागली. ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लादल्याने इतर दुकानांसह हाॅटेल्स, भोजनालयेही बंद होती. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय व्हायला लागली. ही बाब लक्षात घेऊन रिसोड येथील हिंगोली नाका परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी १९ एप्रिलपासून अन्नदान उपक्रम हाती घेण्यात आला. दिवसाला एक हजार जेवणाचे डबे तयार करून ते रिसोड व वाशिमसाठी पाठवले जात आहेत. रिसोडातील दानशूर व्यक्तींसोबतच पोलीस मित्रपरिवार व प्रशासनाने या कार्यास हातभार लावला. दरम्यान, स्वयंपाक बनविणारे, डबे पॅक करून पोच करणाऱ्या सर्व सेवाधारी मंडळीचा सत्कार करण्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेने ठरविले होते. त्यानुसार, तहसीलदार अजित शेलार, ठाणेदार एस.एम. जाधव, स्टेट बँकेचे व्यवस्थापक बलभद्र भुत्तो, ‘भूमिपुत्र’चे संस्थापक विष्णूपंत भुतेकर, शहराध्यक्ष विकास झुंगरे, रवि पाटील जाधव, सीताराम इंगोले, अर्जुनराव तुरूकमाने, डाॅ. राम बोडखे, डाॅ. खानझोडे आदिंच्या उपस्थितीत संबंधित सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गजानन खंदारे यांनी केले. रवि अंभोरे यांनी आभार मानले.