आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:37 AM2021-01-22T04:37:03+5:302021-01-22T04:37:03+5:30
जलव्यवस्थापनाविषयी जनजागृती किन्हीराजा : समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमांतर्गत सध्या परिसरातील गावांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरू आहे. या माध्यमातून प्रामुख्याने ...
जलव्यवस्थापनाविषयी जनजागृती
किन्हीराजा : समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमांतर्गत सध्या परिसरातील गावांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरू आहे. या माध्यमातून प्रामुख्याने जलव्यवस्थापनाविषयी जनजागृती केली जात आहे. यासह मृदा संवर्धनासंबंधी मार्गदर्शन केले जात आहे.
....................
पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी
मेडशी : ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत मेडशी ते अकोला आणि मेडशी ते वाशिम या रस्त्यावर वाहनधारकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासह सीटबेल्ट, हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.
......................
पर्यटकांअभावी शिरपुरात लघू व्यवसाय ठप्प
शिरपूर जैन : कोरोना संकटावर नियंत्रणासाठी लावण्यात आलेला लॉकडाऊन हटविण्यात आला असला तरी अद्याप संसर्गाची भीती पूर्णत: ओसरलेली नाही. यामुळे पर्यटकांनीही भ्रमंती करणे सुरू केले नसल्याने यंदा जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरपुरातील लघुव्यवसाय बहुतांशी ठप्प पडला आहे.
...................
जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वाशिम : प्रदेश महासचिव सारिका अंबुरे यांच्या १४ वर्षीय मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावे, या मागणीसाठी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांनी २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
...................
अजिंक्यपद क्रॉसकंट्री निवड चाचणी
वाशिम : जिल्हास्तरीय अजिंक्यपद क्रॉसकंट्री निवड चाचणी येत्या २६ जानेवारी रोजी स्थानिक जिल्हा क्रीडासंकुलावर आयोजित करण्यात आली आहे. अॅथलेटिक्स संघटनेतर्फे या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
.............
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक
वाशिम : ‘३६५ दिवस शिवजलाभिषेक सोहळा’ या उपक्रमांतर्गत येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास गुरुवारी जलाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवम बेंद्रे, महेश धोंगडे, योगेश लोनसुने, स्वप्निल विटोकार, डॉ. मोहन गोरे, ऋषीकेश अंभोरे आदींची उपस्थिती होती.
.................
वाशिम पोलिसांनी रात्रगस्त वाढविली
वाशिम : रात्रीच्या सुमारास होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाशिम पोलिसांनी रात्रगस्त वाढविली आहे. नागरिकांनीही कुठेही संशयास्पद प्रकार आढळून आल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...............
साहित्य संमेलन नियोजन बैठक उत्साहात
वाशिम : अवलिया महाराज संस्थान काळामाथा (ता. मालेगाव) येथे १०, ११ एप्रिल २०२१ रोजी होणाऱ्या तिसऱ्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची बैठक येथे रविवारी उत्साहात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
.....................
पादचारी मार्ग अतिक्रमणांच्या विळख्यात
वाशिम : येथील श्री शिवाजी विद्यालयापासून आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला असलेला पादचारी मार्ग अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. लघु व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून पादचारी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी मनसेचे मनीष डांगे यांनी न.प.कडे गुरुवारी केली.
...................
कालव्यांद्वारे सिंचन; पाण्याचा अपव्यय
वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातून काही गावांना कालव्यांव्दारे सिंचनासाठी पाणी पुरविले जात आहे. कालवे काही ठिकाणी नादुरुस्त असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.
..................
ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रश्न प्रलंबित
वाशिम : स्थानिक डम्पिंग ग्राऊंडवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था उभारण्यात आली आहे; मात्र अद्याप त्या ठिकाणी हे काम सुरू झालेले नाही. याकडे न.प. प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी शब्बीर परसूवाले यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे केली.
...................
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
वाशिम : येथून हिंगोली, नांदेड व अकोला या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना पॅसेंजर रेल्वेचा पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडणारा होता; मात्र लॉकडाऊनपासून बंद असलेली ही रेल्वे अद्याप सुरू झाली नसून ती सुरू करावी, अशी मागणी लक्ष्मण गायकवाड यांनी गुरुवारी केली.