निर्बंध शिथिल; दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील दुकाने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 11:15 AM2021-06-01T11:15:53+5:302021-06-01T11:15:59+5:30
Unlock Washim : ७ ते दुपारी २ या वेळेत अत्यावश्यक सेवेप्रमाणेच इतरही दुकाने सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली आहे.
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ९ मे पासून जिल्ह्यात लागू असलेले कडक निर्बंध १ जूनपासून शिथिल झाले आहेत. आता सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत अत्यावश्यक सेवेप्रमाणेच इतरही दुकाने सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ३१ मे रोजी जारी केले. दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, सार्वजनिक क्रीडांगण, उद्याने, बगीचे, भाजी मार्केट, आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंदच राहणार आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ९ ते ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लागू होते. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास बरीच मदत झाली असून, रुग्णसंख्या घटली आहे. दुसरी लाट ओसरत असल्याचे पाहून कडक निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानुसार किराणा, फळ, भाजीपाला, पिठाची गिरणी, दूध डेअरी, मांस, अंडी, रेशन दुकाने, कृषी सेवा केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, आपले सरकार सेवा केंद्र आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दूध डेअरी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू राहील. घरपोहोच दूध वितरण सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत करता येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व स्वरूपाची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहतील. शनिवार व रविवार या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व दुकाने, सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.
हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा!
हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी केंद्र येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही.