निर्बंध शिथिल; पण व्यापारी, नागरिक गाफील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:31+5:302021-06-04T04:31:31+5:30
जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीनंतर कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. तेव्हापासून सातत्याने रुग्णसंख्येचा आलेख वाढतच गेला. यासह कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे ...
जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीनंतर कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. तेव्हापासून सातत्याने रुग्णसंख्येचा आलेख वाढतच गेला. यासह कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. यामुळे जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू करून आधी केवळ मेडिकल्स व दवाखाने सुरू ठेवण्यास मुभा दिली. २० मे पासून सकाळी ७ ते ११ अशा चार तासांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद राहायला लागल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले. दैनंदिन ३०० पेक्षा अधिक याप्रमाणात आढळणाऱ्या कोरोना बाधितांचा आकडा २८ मे पासून (२०० च्या खाली) नियंत्रणात आला.
ही बाब लक्षात घेता १ जूनपासून ‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली लागू करून सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्यास सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत मुभा दिली; मात्र कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नाही. त्यामुळे व्यापारी, नागरिकांनी नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले; परंतु बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होण्यासह दुकाने दुपारी दोन वाजेनंतरही सुरू राहत असल्याचे दिसून येत आहे.
.......................
बाॅक्स :
पोलिसांचे ध्वनिक्षेपकाव्दारे आवाहन
दुकाने बंद करण्याची निर्धारित वेळ दुपारी दोन वाजताची आहे; मात्र त्याचे पालन होत नाही. त्यामुळे दररोज पोलिसांना वाहनावरील ध्वनिक्षेपकाव्दारे दुकाने बंद करण्याचे आवाहन करावे लागते. गुरुवारीदेखील पोलीस संपूर्ण बाजारपेठेत फिरून आवाहन करीत असल्याचे दिसून आले.
..............
७३३९
पहिल्या लाटेत आढळलेले बाधित
३२९३६
दुसऱ्या लाटेत आढळलेले बाधित
५८६
कोरोनाने एकूण मृत्यू
..................................
२८ मे ते २ जूनची स्थिती
२८ मे - बाधित - २०५, बरे झालेले - २७५
२९ मे - बाधित - १५८, बरे झालेले - ४०६
३० मे - बाधित - १०८, बरे झालेले - १२४
३१ मे - बाधित - ११४, बरे झालेले - २७२
१ जून - बाधित - ११०, बरे झालेले - २७०
२ जून - बाधित - १०२, बरे झालेले - २४१