वाशिम जिल्ह्यात निर्बंध कडक; सायंकाळी ५ पर्यंतच खुली राहणार दुकाने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:07 PM2021-02-22T12:07:55+5:302021-02-22T12:09:04+5:30
Restrictions strict in Washim District जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संचारबंदीचा सुधारीत आदेश जिल्हाधिकारी शण्मुुराजन एस. यांनी २१ फेब्रुवारी रोजी जारी केला. त्यानुसार जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी रविवारी संचारबंदीचा सुधारीत आदेश जारी केली असून, याचे पालन करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने /आस्थापने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून) हे १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहणार आहेत. सर्व प्रकारची उपाहारगृहे/, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील. लग्नसमारंभाकरिता २५ व्यक्तींना (वधू व वरासह) परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (महाविदयालये, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे आदी कामांकरीता परवानगी राहील. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूकसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. आंतरजिल्हा बस वाहतुकीस ५० टक्के प्रवासी क्षमतेसह परवानगी राहील.
प्रत्येक रविवारी दिवसभर संचारबंदी!
यापुढे सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बाजारपेठ बंद राहतील. प्रत्येक रविवारी दिवसभर संचारबंदी राहणार असून, या काळात दुकाने बंद राहतील. आठवडा अखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुग्धविक्रेते/डेअरी यांची दुकाने यापुढे सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत (आठवड्याचे सातही दिवस) नियमितपणे सुरु राहतील.
हाॅटेलमधील पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा
जिल्ह्यातील सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे ही केवळ एका वेळी १० व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन बंद राहणार आहेत.
मालवाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू राहणार!
मालवाहतूक ही पूर्वीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवाशांना परवानगी राहणार आहे. तीन चाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह फिजिकल डिस्टन्सिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी राहील.