विषारी फवारणीमुळे शेतजमीन व पिकांवर परिणाम
By admin | Published: January 20, 2015 12:40 AM2015-01-20T00:40:40+5:302015-01-20T00:40:40+5:30
सेंद्रिय शेतीचा वापर कमी प्रमाणात: पिके घेण्याच्या पद्धतीत बदल आवश्यक.
वाशिम : पिकांवरील रोगराईचा नाश व्हावा, याकरिता विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे जिल्हय़ात चित्र आहे. या विषारी कीटकनाशकांमुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असला तरी शेतकर्यांकडे याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकर्यांशी केलेल्या चर्चेवरून दिसून आले. काही शेतकरी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल; मात्न या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरक्ष: विषाची फवारणी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता गमावून शेतीच धोक्यात आली आहे. अधिकाधिक उत्पन्न देणार्या बियाणांची मागणी वाढत गेल्याने बीज उत्पादन कंपन्यात चढाओढ निर्माण झाली आहे. नवनवीन वाण बाजारात येत आहे. सोबतच कीटकनाशकांची फवारणी मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतात उत्पादित होत असलेले भाजीपाला, फळे विषाक्त होत आहे. पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी धोक्याचे असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, कृषी संशोघन केंद्राचे प्रभारी अधिकारी, शिवाजी कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले. विदेशात विषारी कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पन्न मिळाले असले तरी हायब्रिड बियाणांमुळे धान्यांचे उत्पादन घटले आहे. आधुनिक शेतीमधील कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकर्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. सेंद्रिय शेती उत्तम असल्याने याचा प्रचार व प्रसार केल्या जात आहे; मात्र अनेक शेतकरी याचा वापरही करीत नाहीत. कृषी संशोधन केंद्र वाशिमच्यावतीने प्राप्त माहितीनुसार शक्यतोवर विषारी कीटकनाशकाची फवारणी टाळण्यात यावी. आवश्यक असल्यास कमी विषारी असलेल्या फवारण्या कराव्यात. तसेच एकच एक पीक न घेता पिकात बदल केल्यास शेतजमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. जिल्हय़ात सोयाबीननंतर हरभरा हेच पीक जास्त प्रमाणात घेतल्या जाते, हेच आलटून पालटून गहू, ज्वारी, मका अशी पिके घेतल्यास कीटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, त्यामुळे शेतकर्यांना याचा अवलंब करणे गरजेचे आहे.