शासनाच्या घोषणेचा व्यापाऱ्यांच्या खरेदीवर परिणाम
By admin | Published: May 15, 2017 07:16 PM2017-05-15T19:16:58+5:302017-05-15T19:16:58+5:30
वाशिम: नाफेडच्या खरेदी कें द्रावर तूर कल्लोळ सुरू असतानाच, शासनाच्या इशाऱ्यानंतरही व्यापारी हमीभावाने तूर खरेदी करीत नसल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.
ऑनलाइन लोकमत
वाशिम: नाफेडच्या खरेदी कें द्रावर तूर कल्लोळ सुरू असतानाच हमीभावाने तूर खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी कायदा करण्याची आणि नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावे तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर व्यापाऱ्यांच्या खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे; परंतु शासनाच्या इशाऱ्यानंतरही व्यापारी हमीभावाने तूर खरेदी करीत नसल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.
यंदा राज्यभरात तुरीचे उत्पादन चांगले झाले. त्यामुळे बाजार समित्यांकडे मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. तथापि, शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव व्यापाऱ्यांकडून मिळत नसल्याने शासनाकडून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच नाफेडद्वारे तूर खरेदी सुरू करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला; परंतु तो फार काळ टिकला नाही.
शासनाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका शेतकऱ्यांना बसला. कधी साठवणूकीची अडचण, तर कधी बारदाण्याचा तुटवडा अशा कारणांमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांमधी ओट्यावर महिना महिना तुरीच्या रखवालीसाठी जागरण करावे लागले. दुसरीकडे व्यापारी कोणत्याच स्थितीत तुरीला हमीभाव देण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांची गत इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. त्यातही नाफेडची खरेदी वारंवार बंद पडल्याने शेतकऱ्यांना वाहनांचा खर्चच एवढा लागला की, त्यांना व्यापाऱ्यांपेक्षाही नाफेडकडे तूर विक्री के ल्याचा अधिकच तोटा झाला. या सर्व गदारोळादरम्यान दस्तूरखुद्द मुख्यमंत्री फडवणीस यांनी हमी भावाने तूर खरेदी न करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी कायदा करण्याची घोषणा केली, तसेच राज्यातील अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर घेऊन नाफेडला विकल्याचा संशय असल्याने व्यापाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे मध्यंतरी सांगण्यात येत होते. या सर्व प्रकारांमुळे व्यापाऱ्यांनी काही दिवस तूर खरेदी बंद केली. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून काही ठिकाणी ती सुरू झाली असली तरी, व्यापाऱ्यांकडून अद्यापही तुरीला हमीभाव मिळत नसल्याचे दिसत असून, त्यांनी खरेदीला थोडा आवर घातल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात मागील दोन दिवसांत व्यापाऱ्यांनी केवळ तीन हजार क्विंटल तूर खरेदी केली, तर मानोऱ्यातील व्यापाऱ्यांनी याच दोन दिवसांत केवळ दीड हजार क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती बाजार समित्यांमधून प्राप्त झाली. या दोन्ही ठिकाणी तुरीला कमाल चार हजारांच्या आतच प्रति क्विंटलचे दर मिळाल्याचेही कळले आहे. त्यात मानोरा येथे ३ हजार ९०० तर कारंजा येथे ३ हजार ९८० रुपये कमाल दर शेतकऱ्यांना मिळू शकले. हे दर हमीभावापेक्षा हजार रुपयांहून अधिक कमी असल्याने व्यापारी शासनाच्या घोषणेलाच भाव देत नसल्याचे दिसत आहे.