वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल जाहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:52 PM2018-05-28T16:52:33+5:302018-05-28T16:52:33+5:30
किन्ही रोकडे येथे अमीर खॉ अलियार खॉ तर चिखलागड येथे तारासिंग राठोड विजयी झाले असून, उर्वरीत १८ ठिकाणी कुणाचाही उमेदवारी अर्जच नसल्याने सदर पदे रिक्त राहिली.
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदाच्या रिक्त जागांसाठी २७ मे रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली. किन्ही रोकडे येथे अमीर खॉ अलियार खॉ तर चिखलागड येथे तारासिंग राठोड विजयी झाले असून, उर्वरीत १८ ठिकाणी कुणाचाही उमेदवारी अर्जच नसल्याने सदर पदे रिक्त राहिली.
जिल्ह्यातील २० ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार, ७ मे पासून १२ मे पर्यंत त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले. १४ मे रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यात जिल्ह्यातील केवळ चिखलागड (ता.मंगरूळपीर) आणि किन्ही रोकडे (ता. कारंजा लाड) या दोनच ग्रामपंचायतींमधून नामनिर्देशपत्रे दाखल झाली.
दरम्यान, या दोन ग्रामपंचायतींपैकी चिखलागड येथे सदस्यपदासाठी झालेल्या निवडणूकीत तारासिंग गबासिंग राठोड आणि ज्योत्स्ना सुरेश राठोड अशा दोन उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये तारासिंग राठोड हे विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार ज्योत्स्ना सुरेश राठोड यांना ६२ मते मिळाली तर तारासिंग राठोड यांना १०७ मते मिळाली तसेच ६ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. निवडणुकीत ९० पुरुष तर ८५ महीला अशा एकूण १७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
कारंजा तालुक्यातील किन्ही रोकडे येथेही सदस्यपदासाठीच पोटनिवडणूक घेण्यात आली. तेथे सै. सादिक सै. अमानऊल्ला आणि अमीर खान आरियार खान यांच्यात लढत झाली. एकंदरित ३५८ मतदारांपैकी २५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २८ मे रोजी कारंजा येथे तहसिल कार्यालयात मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये अमीर खॉ अलियार खॉ यांना १५२ तर प्रतिस्पर्धी सय्यद सादीक सयद अमानुल्ला यांना १०४ मते पडली. त्यामुळे प्रकाश डहाके गटाच्या अमीर खॉ अलियार खॉ यांनी ४८ मतांनी विजय मिळविला. सदर निवडणुकीत दोन मतदारांनी नोटाचा वापर केला. मतमोजणी वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनात निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शिवानंद कानडे यांनी काम पाहिले. उर्वरीत अंतरखेड व भुलोडा येथील रिेक्त असलेल्या सदस्य पदासाठी तसेच झोडगा येथील सरपंच पदाच्या रिक्त जागेकरिता विहित मुदतीपर्यंत एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने सदर जागा रिक्तच राहिल्या.