परतीच्या पावसाचा वाशिम जिल्ह्यातील ३९७८ शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:38 PM2020-10-30T12:38:57+5:302020-10-30T12:39:10+5:30
Agriculture News आर्थिक मदत देण्यासाठी २ कोटी ७८ लाख ३९ हजार ९४८ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने वरिष्ठस्तरावर सादर केला आहे.
वाशिम: जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसामुळे ४०९४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यात ३९७८ शेतकऱ्यांना फटका बसला. या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी २ कोटी ७८ लाख ३९ हजार ९४८ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने वरिष्ठस्तरावर सादर केला आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरपासून संपूर्ण पावसाळाभर नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले. त्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उडिद, मुग, कपाशीसह सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आशार तूर आणि उरलेल्या कपाशीसह सोयाबीन पिकावर टिकल्या असताना ऑक्टोबरच्या सुरुवातीस परतीच्या पावसाचे तांडव जिल्ह्यात सुरू झाले. त्यामुळे पीकांना मोठा फटका बसला. शासन निकषानुसार केवळ १२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.
मंगरुळपीर तालुक्याला सर्वाधिक फटका
ऑक्टोंबरमधील परतीचा पावसाचा सर्वाधिक फटका मंगरुळपीर तालुक्याला बसला. या तालुक्यातील ५ महसूल मंडळात हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन तसेच कपाशी पावसामुळे उध्दवस्त झाली.याचे पंचनामे पुर्ण झाले आहे.
परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. यात ४०९४ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले. यात ३९७८ शेतकऱ्यांना फटका बसला.मदत देण्यासाठी २.७८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.
-शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम