महसूल विभाग प्रभारी; चार उपजिल्हाधिकाऱ्यांसह ६० पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:48 AM2021-09-17T04:48:54+5:302021-09-17T04:48:54+5:30
वाशिम जिल्ह्याची निर्मिती १९९८ मध्ये झाल्यानंतर येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस मुख्यालय, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह ...
वाशिम जिल्ह्याची निर्मिती १९९८ मध्ये झाल्यानंतर येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस मुख्यालय, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर काही महत्त्वाची जिल्हास्तर कार्यालये सुरू झाली. अद्यापही काही जिल्हा मुख्यालयाचा अभाव येथे असून, या मुख्यालयाशी संबंधित कामे अकोला येथून होत असताना जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या विविध विभागात रिक्त पदांची समस्या वाढत आहे. त्यात महसूल विभागाचाही समावेश असून, या विभागात ६० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने हा प्रभागच प्रभारी झाला आहे.
०००००००००००००००००
जिल्हाधिकारी कार्यालयात तीन विभाग प्रभारीकडे
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत मंजूर आणि रिक्त पदांची स्थिती अत्यंत बिकट आहे. जिल्ह्याचा सर्व कारभार सांभाळल्या जाणाऱ्या या कार्यालयातच उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार आणि चालकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. एका अधिकाऱ्यांकडे दोन दोन विभागाचा प्रभार येत असल्याने कामाचा खोळंबा होऊन जनतेला अडचणी येत आहेत. त्यामुळे ही पदे भरण्याची तसदी शासनाने घेण्याची मागणी होत आहे.
०००००००००००००००००
तीन विभाग प्रभारींच्या भरवशावर
जिल्हाधिकारी कार्यालयात मंजूर सहा उपजिल्हाधिकारी पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत, तर एक उपजिल्हाधिकारी रजेवर असल्याने दोनच उपजिल्हाधिकाऱ्यांवर सहा विभागांची जबाबदारी आहे. त्यात पुरवठा विभाग, रोहयो विभाग आणि भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांचे एक पद रिक्त असून, भूसंपादन विभागातीलच श्रेणी १ उपजिल्हाधिकारी रजेवर आहेत. त्यामुळे निवडणूक, महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार सोपविला आहे.
०००००००००००००००००
निराधार योजनेच्या चार नायब तहसीलदारांची पदे व्यपगत
जिल्ह्यात सहा तालुक्यांत सहा तहसील कार्यालये असून, या सहा तहसील कार्यालयांतील संजय गांधी निराधार योजना विभागातील चार नायब तहसीलदारांची पदे नऊ वर्षांपूर्वी रिक्त असताना प्रशासनाने रिक्त पदांचा अहवाल नियमित पाठविताना ही पदे भरण्यासाठी जोरच दिला नाही. परिणामी कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव आणि रिसाेड येथील संजय गांधी निराधार विभागातील नायब तहसीलदारांची पदेच व्यपगत झाली असून, त्याचा भार अव्वल कारकुनांवर येत आहे.
०००००००००००००००००
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूलची रिक्त पदे
पद मंजूर रिक्त
उपजिल्हाधिकारी - ०६ - ०३
तहसीलदार - ०३ - ०३
नायब तहसीलदार - १० - ०५
-----------------
तालुकास्तरावर महसूलची रिक्त पदे
पद - रिक्त
नायब तहसीलदार - ११
मंडळ अधिकारी - ०७
तलाठी - २०
वाहनचालक - ०६
शिपाई - ०६
--------------------------------
कोट: जिल्ह्यातील महसूल विभागांतर्गत मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा अहवाल नियमितपणे शासनाकडे पाठिवला जातो. काही पदे अलीकडेच रिक्त झाली असून, ती तातडीने भरली जावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
-शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी