महसूल कर्मचारी संपावरच; कामाचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:42 PM2017-10-13T19:42:08+5:302017-10-13T19:43:53+5:30
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन १३ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते. गत चार दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने महसूलचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन १३ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते. गत चार दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने महसूलचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.
पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळसेवेने भरल्यास महसुल विभागातील अव्वल कारकुन दर्जाचे कर्मचा-यावर अन्याय होणार असून अनेक अव्वल कारकुन संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सुचनेला स्थगिती देण्यात यावी तसेच कनिष्ठ लिपिक पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करणे, जुनी पेंशन योजना लागू करणे, पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवेने न भरता पदोन्नतीने भरणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, ५ दिवसाचा आठवडा करणे, अव्वल कारकून संवर्गाची वेतन त्रुटी दूर करणे, आकृतीबंधाबाबत सकारात्मक निर्णय घेणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती तात्काळ देणे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाचे महसूलविषयक कामकाज ठप्प झाले आहे. हा संप वाशिम जिल्ह्यात १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांच्यासह सुनील घोडे, अनिल घोडे, अरविंद करंगळे, अतूल देशमुख, जीवन मोरे, गणेश ढोरे, अरविंद पारवे, प्रशांत देशपांडे, किरण आमनोरे, बबनराव व्यवहारे, महिला प्रतिनिधी अर्चना घोळवे, रंजना अडकिने आदींनी केला आहे.