महसूल अधिकारी बनले ‘गुरुजी’!

By admin | Published: July 6, 2017 01:17 AM2017-07-06T01:17:03+5:302017-07-06T01:17:03+5:30

युवकांना मार्गदर्शन : प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षेचा वर्ग

Revenue officer became 'Guruji'! | महसूल अधिकारी बनले ‘गुरुजी’!

महसूल अधिकारी बनले ‘गुरुजी’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाविद्यालयीन युवकांना एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षेविषयी इत्थंभूत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यशाळा सुरू केली आहे. या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांनी गुरुजी बनत युवकांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक तथा तहसीलदार आनंद देऊळगावकर, तहसीलदार शीतल वाणी, समाजकल्याण विभागाचे विशेष निरीक्षक अनंत मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शीतल वाणी म्हणाल्या, की स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना आपल्याकडे असलेल्या वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. वेळेचे नियोजन व्यवस्थित करणे शक्य झाले, तर कमी कालावधीत यश मिळविणे शक्य आहे, अशा शब्दात त्यांनी युवकांना विश्वास दिला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपले ध्येय निश्चित असणे आवश्यक आहे. आपण कोणत्या पदाच्या परीक्षेला सामोरे जाणार आहोत, हे निश्चित करून त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सर्वसमावेशक पुस्तकांची अभ्यासासाठी निवड करावी. अभ्यासाचा आवाका लक्षात घेऊन वेळेचे चोख नियोजन करणे महत्त्वाचे आहे. तसेच पुस्तक वाचनाबरोबरच दैनंदिन घडामोडींची माहिती घेण्यासाठी वृत्तपत्रे, इंटरनेटचा आवश्यकतेनुसार उपयोग करणेही तितकेच गरजेचे आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आकलन चांगले होते. मात्र ग्रुपमधील प्रत्येक सदस्य हा स्पर्धा परीक्षा व अभ्यासाचे गांभीर्य जाणणारा असेल, याची खबरदारी घेणेसुद्धा गरजेचे असल्याचे वाणी यांनी स्पष्ट केले.
यावेळी तहसीलदार देऊळगावकर म्हणाले, की स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडताना अतिशय प्रामाणिकपणे मनापासून तयारी असणे आवश्यक आहे. या परीक्षांसाठी राज्यातून, देशातून लाखो उमेदवार प्रयत्न करीत असतात. त्यामुळे आपल्याला यश मिळवायचे तर खडतर परिश्रम व प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. केवळ इतर लोक सांगतात म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास न करता मनापासून आवड असेल तरच परीक्षेचा पर्याय निवडा. पाया पक्का होण्यासाठी पाचवी ते बारावीपर्यंतच्या पुस्तकांचे वाचन करा. त्यानंतर ज्या परीक्षेला सामोरे जायचे आहे, त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमाला अनुसरून पुस्तकांची निवड करा. वेळेचे नियोजन व प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर यश निश्चित मिळते, असे देऊळगावकर म्हणाले.

Web Title: Revenue officer became 'Guruji'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.