महसूलची वसुली ६१ टक्के!
By admin | Published: March 3, 2017 08:25 PM2017-03-03T20:25:02+5:302017-03-03T20:25:02+5:30
वाशिम जिल्हा प्रशासनाची कसरत; उद्दिष्टपूर्तीसाठी उरला केवळ एक महिना.
वाशिम: जिल्ह्याला सन २0१६-१७ या वर्षासाठी शासनाकडून ४३.५१ कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आर्थिक वर्षातील शेवटच्या महिन्यापर्यंत त्यापैकी केवळ २८.९३ लाख रुपये महसूल गोळा झाला असून, त्याचे प्रमाण ६६.५0 टक्के आहे. आता उर्वरित महिनाभरात शिल्लक राहिलेले १४.५७ कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
वाशिम जिल्ह्याला २0१६-१७ या वर्षासाठी जमीन महसूल, करमणूक कर व गौण खनिज वसुली मिळून एकूण ४३.५१ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या महसुलाच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करून उद्दिष्ट गाठण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे आणि सर्वच उपविभागीय महसूल अधिकारी आणि तहसीलदारांसह महसूल वसुलीसाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांनंतरही महसूल प्रशासनाला २८ फेब्रुवारी २0१७ पर्यंत केवळ २८ कोटी ९३ लाख ५६ हजारांची वसुली करणे शक्य झाले. यात खनि कर्म वसुलीच्या २ कोटी ३0 लाख ५३ हजारांसह वाशिम तालुक्यात निर्धारित १0.५४ कोटींच्या उद्दिष्टापैकी ९ कोटी २३ लाख ५३ हजार, कारंजा तालुक्यातील निर्धारित ९ कोटी ४७ लाख २४ हजारांच्या उद्दिष्टापैकी ६ कोटी ३0 लाख ७६ हजार, रिसोड तालुक्यातील ६ कोटी ३३ लाखांपैकी ३ कोटी ८९ लाख, मंगरुळपीर तालुक्यातील ६ कोटी २९ लाखांपैकी ३ कोटी ८५ लाख ७0 हजार, मालेगाव तालुक्यातील ५ कोटी ४७ लाखांपैकी २ कोटी 0४ लाख ११ हजार, तर मानोरा तालुक्यातील ५ कोटी ४१ लाखांपैकी १ कोटी २९ लाख ९३ हजारांच्या वसुलीचा समावेश आहे. आता उर्वरित १४ कोटी ४८ लाख रुपयांच्या महसूल वसुलीसाठी सर्वच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यापयर्ंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जमीन महसूल, करमणूक कर व गौण खनिजाची वसुली करण्यात येत आहे. तथापि, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी उरला असल्याने या कालावधीत प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, यावर्षी नगरपालिका निवडणुकांसह पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जिल्हा प्रशासन व्यस्त असल्याने महसूल वसुलीवर विशेष लक्ष त्यांना देता आले नाही. तथापि, २९ दिवसांत उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.