शिष्यवृत्ती खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी होणार पुनर्पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 02:57 PM2018-12-06T14:57:32+5:302018-12-06T15:03:03+5:30
अनियमिततेची चौकशी पूर्ण; सनदी लेखापालांची नियुक्ती केली जाणार
वाशिम : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क या योजनेत झालेल्या अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली आहे. दरम्यान, आता खर्चाचा ताळमेळ बसवला जाणार असून पुर्नपडताळणी करण्यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिष्यवृत्ती योजनेतील अनियमिततेसंबंधी चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकाने चौकशी करून अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे १ जानेवारी २०१० ते ३१ मार्च २०१७ पर्यंतचे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यासह इतर योजनांमधून झालेल्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यात येणार आहे. ही तपासणी सनदी लेखापालांमार्फत करण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाला देण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती आणि शुल्क विषयक योजनांच्या आर्थिक बाबीचे समायोजन, ताळमेळ आणि इतर बाबींची तपासणी सनदी लेखापालांकडून एक महिन्याच्या आत करुन तसा सविस्तर अहवाल समाज कल्याण आयुक्तालयास सादर करावयाचा आहे. या अनुषंगाने खर्चाचा ताळमेळ करून घेण्यासाठी पुर्नपडताळणी केली जाणार असून जिल्ह्यातील सनदी लेखापालांकडून ७ डिसेंबरपर्यंत दरपत्रके मागवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.