कोरोना विषाणू लसीकरण तयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:49 AM2021-01-12T11:49:01+5:302021-01-12T11:49:26+5:30
Corona vaccine जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा वाकाटक सभागृहात घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना या जागतिक महामारीवर प्रतिबंध करण्यासाठी स्वदेशी लस उपलब्ध झाली आहे. देशपातळीवर कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी संशोधित केलेली लस प्रभावी ठरणार आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असताना जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा ११ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात घेतला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. संदीप हेडाऊ, एस. टी. आगार व्यवस्थापक वाशिम यांचे प्रतिनिधी, युनिसेफ कन्सलटंट डॉ. शैलेश पाटील, आरोग्य विभागाच्या एस. पी. चव्हाण, लसीकरण यंत्र संनियंत्रक संतोष इंगळे व मंगला लाटकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. म्हणाले, १६ जानेवारीपासून सुरू होणारी कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि वीज वितरण कंपनीने आरोग्य यंत्रणेशी कोरोना लसीकरणासाठी योग्य समन्वय ठेवून लसीकरण मोहीम यशस्वी करावी. जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नियमितपणे कोरोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पॅनकार्ड, आधारकार्ड असणे आवश्यक
लसीकरणाच्या वेळी लस घेणाऱ्यांची पोर्टलवर एंट्री करण्यासाठी संबंधित व्यक्तीने पॅनकार्ड आणि आधारकार्ड सोबत आणावे. लसीकरणाच्या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण खोली, प्रतीक्षा खोली, देखरेख खोली अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लस दिल्यानंतर लाभार्थ्यास ३० मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे