आरोग्य कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चाचा आढावा! वाशिममध्ये सीआरएम चमूच्या भेटी
By संतोष वानखडे | Published: November 8, 2022 05:26 PM2022-11-08T17:26:03+5:302022-11-08T17:26:56+5:30
एका चमूने जिल्ह्यामधील आरोग्य कार्यक्रमांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत होणाऱ्या खर्चाचा आढावा घेतला.
वाशिम (संतोष वानखडे) : केंद्र सरकारच्या १४ प्रतिनिधींच्या ‘सीआरएम’ (कॉमन रिव्ह्यू मिशन) चमूने ग्रामीण रुग्णालयांसह स्त्री रुग्णालय व काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत आरोग्यविषयक सुविधांची पाहणी केली तसेच एका चमूने जिल्ह्यामधील आरोग्य कार्यक्रमांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत होणाऱ्या खर्चाचा आढावा घेतला.
केंद्र शासनाने देशभरात २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) सुरू केले. याअंतर्गत माता व बालमृत्यू दर कमी करणे, मलेरिया व डेंग्यू यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविणे, सांसर्गिक व असांसर्गिक रोगांचा प्रसार थांबविणे, महिला व मुलांसाठी चांगल्या तथा दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, ग्रामीण भागातील मुलांच्या लसीकरणावर भर देणे, क्षयरोगाचे नियंत्रण यांसह इतरही विविध स्वरूपातील आरोग्यविषयक बाबींवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. या सर्व कामांचे मुल्यांकन करणे, आरोग्य सुविधांचा आणि आरोग्य कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चाचा आढावा तसेच आरोग्य संस्थांमध्ये देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती घेण्यासाठी सीआरएम चमू जिल्ह्यात दाखल झालेली आहे.
स्त्री रुग्णालय वाशिम, ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर, कारंजा उपजिल्हा रुग्णालय इत्यादी ठिकाणी भेटी देऊन आरोग्य संस्थांमध्ये देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती घेतली व तपासणी केली तसेच त्यामधील एका टीमने जिल्ह्यामधील आरोग्य कार्यक्रमांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत होणाऱ्या खर्चाचा आढावा घेतला.
सरकारी रुग्णालयांनी कात टाकली
तपासणी, मुल्यांकनासाठी केंद्रीय चमू येणार असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यांसह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांनीदेखील कात टाकली आहे. रुग्णालय परिसर चकाकत असून, डाॅक्टर व कर्मचारीदेखील ‘ड्रेस कोड’ वर पाहावयास मिळत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"