शालेय पोषण आहारचा तांदूळ अन्यत्र आढळला; गोडावूनला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 04:00 PM2020-02-26T16:00:55+5:302020-02-26T16:01:03+5:30
सदर गोडावूनला सील ठोकले असून, शिक्षण विभागातर्फे ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ व अन्य धान्य वाशिमनजीकच्या एका गोडावूनमधून अन्यत्र ट्रकने नेत असल्याच्या संशयावरून पोलीस व शिक्षण विभागाने २६ फेब्रुवारी रोजी पकडला. सदर गोडावूनला सील ठोकले असून, शिक्षण विभागातर्फे ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती वाढविणे, आहारातून पोषक तत्वे मिळावी, गरजू विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेता यावा या उद्देशातून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, अनुदानित व अंशत: अनुदानित खासगी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून संबंधित शाळांना आवश्यक त्या अन्नधान्याचा पुरवठा दरमहा नियोजित तारखेला केला जातो. वाशिम ते अकोला या महामार्गानजीक वाशिम शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या एका गोडावूनमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गतचा तांदूळ व अन्य धान्य असल्याची गुप्त माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलीस स्टेशनला दिली होती. यावरून वाशिम शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घटनास्थळ गाठून पाहणी केली. तेथे तांदळाचे काही पोते भरून असलेल्या एक ट्रक आढळून आला. काही वेळाने प्राथमिक शिक्षण विभागाच्या चमूने घटनास्थळी भेट देऊन पंचमाना केला. सदर गोडावूनला सील ठोकले असून, पुढील कार्यवाहीसाठी पुरवठा विभाग तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे सदर प्रकरण वर्ग केले जाणार आहे. दरम्यान शिक्षण विभागातर्फे वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनलाही तक्रार देण्यात आली. त्यानुसार हा तांदूळ नेमका शालेय पोषण आहार योजनेतील आहे की नाही, याची शहानिशा करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या वृत्ताला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दुजोरा दिला.