वाशीम जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक जलसाठा; पण पाणी केले आरक्षित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 09:23 AM2017-12-01T09:23:37+5:302017-12-01T09:24:04+5:30
जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक लसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून जिल्हयातील पैनगंगा नदीवर जलसंपदा विभागाने ११ ठिकाणी बॅरेजेस उभे केले. त्यात यंदाच्या पावसाळ्यानंतर १०० टक्के पाणीसाठा झाला. आताही ५० टक्क्याच्या आसपास जलसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
पैनगंगा नदीवर वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी प्रथम प्राधान्याने बॅरेजेसची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. इतर ठिकाणचे सिंचन प्रकल्प, गावतलावांची पाणीपातळी झपाट्याने खालावली असताना या बॅरेजेसमध्ये मात्र पुरेसा जलसाठा आहे. त्याचा वापर उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्याकरिता करण्याचे प्रशासनाने निश्चित केले असून बॅरेजेसमधून सिंचनासाठी थेंबभरही पाणी वापरू नये, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाचे उल्लंघन करणाºयाविरूद्ध धडक कारवाई करण्याचा फतवाही प्रशासनाने जाहीर केला आहे. यामुळे सिंचन होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंग पावले असून, रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी थोडेफार तरी पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.