रिधोरा पाइपलाईन तोडफोडप्रकरणी कारवाईचे निर्देश!
By admin | Published: April 27, 2017 12:27 AM2017-04-27T00:27:32+5:302017-04-27T00:27:32+5:30
मालेगाव : तालुक्यातील रिधोरा येथे जिल्हा विकास योजनेअंतर्गत रस्ता दुरुस्ती व माती भराव काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराकडून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनची तोडफोड करण्यात आली.
मालेगाव : तालुक्यातील रिधोरा येथे जिल्हा विकास योजनेअंतर्गत रस्ता दुरुस्ती व माती भराव काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराकडून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे निेर्देश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत.
मौजे रिधोरा येथे जिल्हा विकास योजना ३०५४ अंतर्गत रिधोरा ते गोकसावंगी या रस्त्याची दुरूस्ती व भरावचे काम जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मालेगावअंतर्गत गणेश देशमुख नामक कंत्राटदाराकडून सुरु आहे. काम करताना ठेकेदाराकडू उर्ध्व मोर्णा प्रकल्पावरुन रिधोरा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजनेची एक किलोमिटरची पाईपलाईन जेसीबी मशिनव्दारा खोदकाम करताना फोडल्या गेली. त्यामुळे उन्हाळयाच्या दिवसात ग्रामस्थांना भेडसावणारी पाणी समस्या अधिकच गंभीर झाली. या बाबीची दखल घेत ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी संबंधिताकडे १५ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली; तर भारीप बहूजन महासंघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप सावळे यांनी देखील १९ एप्रिल रोजी दाखल करुन पाईपलाईन तोडफोड प्रकरणी संबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाई घेवून दोषीवर गुन्हा दाखल करावा व पाणीपुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली होती. तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधितांकडून झालेल्या पाईपलाईन तोडफोडप्रकरणी नुकसान भरपाई किंवा नव्याने पाईप लाईन टाकण्याबाबतचे निर्देश दिले असून सदर काम मुदतीत पूर्ण न झाल्यास पुढील कारवाई करण्याचे आदेश आहेत.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पाईपलाईन तोडफोड प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होणार नाही.
- संतोष मार्के, अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प., वाशिम
--