Right To Education : मोफत प्रवेशासाठी चवथ्यांदा मुदतवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 04:46 PM2020-11-21T16:46:31+5:302020-11-21T16:46:38+5:30
Right To Education News २३ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याला मुदतवाढ देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत मोफत प्रवेश घेण्यासाठी चवथ्यांदा मुदतवाढ मिळाली असून, आता २३ नोव्हेंबरपर्यंत मोफत प्रवेश घ्यावे लागणार आहेत.
आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी मार्च महिन्यात पुणे येथे पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली. आरटीई अंतर्गत जिल्ह्यात १०१ शाळांची नोंदणी झाली असून, १०११ जागा या मोफत प्रवेशासाठी राखीव आहेत. पहिल्या लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर ३० सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादीतील बालकांना २३ आॅक्टोबरपर्यंत मोफत प्रवेशाची संधी दिली होती. या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील ९७६ पैकी ६०६ बालकांनी प्रवेश घेतले. उर्वरीत ३७० बालकांचे प्रवेश झाले नसल्याने त्यांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागले. प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे किंवा बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांना शाळेशी संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शाळेच्या व्हॉटस् अॅप क्रमांकावर किंवा ई-मेल, अन्य सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे आवश्यक कागदपत्रे सादर करून तात्पुरता प्रवेश निश्चित करता येणार आहे.
वारंवार मुदतवाढ मिळूनही ३७० बालकांच्या पालकांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत. या बालकांना मोफत प्रवेशाची आणखी एक संधी म्हणून २३ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याला मुदतवाढ देण्यात आली.