रिसोड नगर परिषदेवर जनविकास आघाडीचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी विजयमाला आसनकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 05:01 PM2018-12-10T17:01:20+5:302018-12-10T17:02:16+5:30
रिसोड (वाशिम) : नगर परिषदेत सर्वात मोठी आघाडी म्हणून जनविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या स्थानावर भारिप-बमसं तर सेना, भाजपा महाआघाडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषद निवडणुकीचा निकाल सोमवार, १० डिसेंबर रोजी जाहिर झाला असून, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णा आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. नगर परिषदेत सर्वात मोठी आघाडी म्हणून जनविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या स्थानावर भारिप-बमसं तर सेना, भाजपा महाआघाडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सोमवार, १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. नगराध्यक्ष आणि एकूण १० प्रभागातून २० नगर सेवक पदासाठी ही निवडणूक झाली. अटितटीच्या या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या नऊ जागा विजयी झाल्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनविकास आघाडीच्या विजयमाला कृष्णा आसनकर यांना सात हजार ६४२ मते, भारिप-बमसंच्या शेख नजमाबी ख्वाजा यांना चार हजार ९८८, शिवसेना, भाजपा, शिवसंग्राम महाआघाडीच्या ज्योती अरूण मगर यांना दोन हाजार ६२१, अपक्ष मंगला किरण क्षीरसागर यांना एक हजार १९० तर काँग्रेसच्या शितल बंडू वानखेडे यांना ९५६ मते मिळाली. आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत जनविकास आघाडीने २० उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ९ उमेदवार विजयी झाले. नगर परिषदेत सर्वात मोठी आघाडी म्हणून जनविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये निवडून आलेले दोन अपक्ष उमेदवारही जनविकास आघाडीचेच असल्याचा दावा करण्यात आला.
असे आहे पक्षीय बलाबल ---
जनविकास आघाडी - नगराध्यक्ष
पक्षनिहाय नगरसेवक
जनविकास आघाडी - ९
काँग्रेस - ३
शिवसेना - ३
अपक्ष - ३
भारिप-बमसं - २