डिझेलच्या वाढत्या दरामुळे खासगी वाहतूकदारांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:58+5:302021-03-05T04:41:58+5:30
मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे खासगी प्रवासी वाहतूकदार संकटात सापडले आहेत. त्यातच गतवर्षी लॉकडाऊनमुळे जवळपास सहा महिने खासगी ...
मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे खासगी प्रवासी वाहतूकदार संकटात सापडले आहेत. त्यातच गतवर्षी लॉकडाऊनमुळे जवळपास सहा महिने खासगी प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे परिसरात दुचाकींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. मधल्या काळात शासनाने बरेच निर्बंध शिथिल केल्याने खासगी प्रवासी वाहतूक सुरळीत होऊ लागली; परंतु याच कालावधीत डिझेलचे दर वाढू लागले. गत वर्षभराच्या काळात प्रती लिटरमागे डिझेलच्या दरात २० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. याचा विपरीत परिणाम खाजगी वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे या डिझेल दरवाढीने कंबरडे मोडले आहे. आधीच कोरोना संसर्गामुळे प्रवाशांची संख्या कमी होत असताना डिझेलच्या वाढत्या दरामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणे आता परवडणारे राहिले नाही. त्यामुळे काही खासगी प्रवासी वाहतूकदारांनी आपली वाहने उभी करून पर्यायी व्यवसाय निवडल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
--------------
कोट: मे २०२० चा आसपास डिझेलचे दर ६५ रुपये लिटर असे होते. आज रोजी डिझेलचे दर ८७.५० इतके झाले आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणे अतिशय अवघड झाले आहे.
-संजय गोरे, खासगी प्रवासी वाहतूकदार, मालेगाव