फुटलेल्या जलवाहिनीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:13+5:302021-02-05T09:21:13+5:30
अकोला - आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक महिन्यांपासून मानोरा तालुक्यामध्ये सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची २८ गावांना ...
अकोला - आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक महिन्यांपासून मानोरा तालुक्यामध्ये सुरू आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची २८ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेची जलवाहिनी या महामार्गाला लागूनच दिग्रसकडून मानोरा तालुक्यात टाकण्यात आलेली आहे. बेलोरा या गावाजवळ मोठ्या पुलाचे काम मागील अनेक महिन्यापासून करण्यात येत असल्यामुळे वाहनांच्या आवागमनासाठी निर्माणाधीन पुलाच्या डाव्या बाजूला देण्यात आलेल्या बायपासवर वरील बाजूला जलवाहिनी फुटून या जलवाहिनीतील पाणी अरुंद रस्त्यावर येत असल्याने विशेषतः दुचाकीने ये जा करणाऱ्या प्रवाशांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कारखेडा ता. मानोरा येथील गणेश राठोड हा युवक या ठिकाणी चिखलात घसरून पाय फॅक्चर झाल्याने मजुरी करीत असलेल्या राठोड यांच्या कुटुंबावर मागील अनेक दिवसांपासून उपासमारीची पाळी आलेली आहे.
चिखलामुळे घसरून गंभीर अपघात होण्याआधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या फुटलेल्या जलवाहिनीला तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.